आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहकार कायद्यात बदल करण्यासाठी प्रयत्न सुरू - राजेश टोपे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी - राज्यातील अनेक सहकारी संस्था राजकारणाचे अड्डे झाल्याने बंद पडल्या आहेत. साखर कारखाने, दूध संस्था ही शेतकर्‍यांची मंदिरे आहेत. तेथे काम करताना राजकीय जोडे बाजूला ठेवण्याचा संदेश वसंतदादा पाटील यांनी दिला होता. तो न पाळल्याने या संस्था लयास गेल्या. फसवणुकीमुळे पतसंस्था डबघाईस आल्या. असे प्रकार टाळण्याकरिता सहकार कायद्यात दुरुस्तीसाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

राहुरी येथील पद्मावती मल्टिस्टेट सोसायटीचे उद्घाटन टोपे यांच्या हस्ते शुक्रवारी सायंकाळी झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी खासदार प्रसाद तनपुरे होते. टोपे म्हणाले, आर्थिक क्षेत्रातील संस्थांत काम करताना विश्वासार्हता, मेहनत, प्रामाणिकपणा, तसेच आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देता आली पाहिजे, तरच भरभराट होईल. राजकारणामुळे अनेक संस्था बंद पडल्या. मात्र, नवीन कायद्यामुळे सहकार क्षेत्र शासनाच्या जोखडातून मुक्त होणार आहे. सभासद व संचालक यांची जबाबदारी वाढून स्पध्रेत टिकण्यासाठी सचोटीशिवाय पर्याय राहणार नाही. संस्था काढणे सोपे आहे, पण ती चालवताना दक्ष राहावे लागते, याची जाणीव संचालकांनी ठेवली पाहिजे.

तनपुरे म्हणाले, कर्ज वितरण व वसुली यावर पतसंस्था, बँका, सेवा संस्था यांचे भवितव्य अवलंबून असते. ठेवीदारांचा विश्वास महत्त्वाचा असतो. राहुरीत विविध बँका येत आहेत. शहरात व्यापारीकरण होत असताना बँकांनाही महत्त्व आले त्यातूनच स्पर्धा हेाऊ लागल्या.

माजी आमदार भानुदास मुरकुटे, आमदार अरुण जगताप यांचीही भाषणे झाली. माजी आमदार चंद्रशेखर कदम, सभापती अरुण तनपुरे, सभापती शिवाजी गाडे, सिध्दार्थ मुरकुटे, नगराध्यक्ष गयाबाई ठोकळे आदी उपस्थित होते. डॉ जयंत कु लकर्णी यांनी प्रास्ताविक, तर प्रकाश पवार यांनी आभार मानले.

नवीन पदवी अभ्यासक्रमास मंजुरी

राहुरीच्या कला, शास्त्र व वाणिज्य महाविद्यालयास ‘जैव तंत्रज्ञान’ या नवीन पदवी अभ्यासक्रमास परवानगी दिली जाईल, अशी माहिती मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या निवासस्थानी राहुरी महाविद्यालयाचे प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने मंत्री टोपे यांची भेट घेऊन जैवतंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमास मान्यता मिळावी, अशी मागणी केली. मागील वर्षी याच महाविद्यालयास 11 नवीन अभ्यासक्रमास परवानगी दिल्याबद्दल टोपे यांचा सत्कार करण्यात आला. प्रसाद तनपुरे , प्राचार्य संभाजी पठारे, प्रा. डॉ. असरार शेख, प्रा. सूर्यकात गडकरी, प्रा. बाळासाहेब कुलकर्णी, अमोल भालसिंग, प्रकाश वरगुडे, धनंजय झावरे, सागर तनपुरे, अपेक्षा दिघे आदी उपस्थित होते. नगरपरिषदेच्या वतीने उपाध्यक्ष सोमनाथ तनपुरे यांनी व बाजार समितीच्या वतीने सभापती अरुण तनपुरे यांनी टोपेंचा सत्कार केला.