आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आचारसंहितेचे पालन न केल्यास कठोर कारवाई; पोलिस अधीक्षकांचा इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापालिका निवडणुकीत आचारसंहितेचे पालन न करणार्‍यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा पोलिस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांनी मंगळवारी दिला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना आचारसंहितेची माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत शिंदे बोलत होते. निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सदानंद जाधव, अतिरिक्त जिल्हाधिकारी रवींद्र जगताप, मनपा आयुक्त विजय कुलकर्णी, सहायक आयुक्त संजीव परशरामी आदी यावेळी उपस्थित होते.
शिंदे म्हणाले, निवडणूक कालावधीत कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस प्रशासन कडक बंदोबस्त तैनात करणार आहे. निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. निवडणूक कालावधीत चार विभागांत स्वतंत्र पोलिस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. गुंडगिरीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. मतदानाच्या दिवशी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. उमेदवारांनी प्रचारफेरी काढताना अधिकृत परवानगी घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.