आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण : चार महाविद्यालयांवर कारवाईचा प्रस्ताव !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अकरावी प्रवेश अर्ज मोफत उपलब्ध करून देणे तसेच सर्व शाळांमध्ये दहावीपर्यंत मुलांना व बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत शिक्षण देण्याचे निर्देश आहेत. तथापि काही शाळांमध्ये त्याची अंमलबजावणी झाली नसल्याचा आरोप युगंधर युवा प्रतिष्ठानने केला होता. याप्रकरणी माध्यमिक शिक्षणाधिकारी परशुराम कापसे यांनी चार कनिष्ठ महाविद्यालयांवर दंडात्मक कारवाई प्रस्तावीत केली आहे.

अकरावी प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांकडून शुल्क आकारले जात असल्याची तक्रार युगंधर प्रतिष्ठानने जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिका-यांकडे निवेदनाद्वारे केली होती. 27 मे 2013 च्या शासन निर्णयानुसार अकरावीचा प्रवेशअर्ज मोफत उपलब्ध करणे, सर्व शाळांमध्ये दहावीपर्यंत मुलांना व बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत शिक्षण देण्याचे निर्देश आहेत. परंतु, या शासन निर्णयाचे शैक्षणिक संस्था पालन करीत नाहीत, असा आरोप संघटनेने केला होता. यासंदर्भात शिक्षणाधिका-यांनी संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांना पत्र पाठवून खुलासा मागितला होता. पत्रात म्हटले होते की, शासन निर्णयानुसार सर्व अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयतून बारावीपर्यंत मुलींना नि:शुल्क शिक्षण उपलब्ध आहे. यानुसार कार्यवाही करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पेमराज सारडा महाविद्यालय, रेसिडेन्सिअल ज्युनिअर कॉलेज, अहमदनगर कॉलेज, न्यू आर्टस् कॉमर्स अँड सायन्स कॉलेज या महाविद्यालयांनी खुलासे सादर केले आहेत. शिक्षणाधिका-यांनी हे खुलासे समाधानकारक नसल्याचे स्पष्ट करून शिक्षण उपसंचालकांकडे दंडात्मक कारवाई प्रस्तावित केली आहे.

बेकायदेशीर रक्कम परत करा
- शासन निर्णयानुसार मोफत शिक्षण न दिल्यास तसेच पालकांकडे पैसे मागितल्यास आमच्या प्रतिष्ठानशी संपर्क साधावा. प्रतिष्ठान संबंधित शालेय संस्थेला निर्णयाची आठवण करून देईल. प्रसंगी आंदोलन देखील करेल. प्रवेशाच्यावेळी बेकायदेशीरपणे घेतलेल्या शुल्काच्या दुप्पट रक्कम पालकांना अदा करावी, अशी आमची मागणी आहे.’’ प्रदीप ढाकणे, अध्यक्ष, युगंधर युवा प्रतिष्ठान.

न्यू आर्टस् कॉलेज
अकरावी प्रवेशासंदर्भात सहविचार सभेत प्रवेश अर्ज व माहिती पत्रकाचे शुल्क न घेण्याबाबत नेटवरून शासन निर्णयाची माहिती घेण्याचे निर्देश दिले होते. परंतु, तशा स्वरूपाचा कोणताही जी.आर. इंटरनेटवर आम्हास मिळाला नाही. शिक्षण उपसंचालकांशी संपर्क साधला असताना त्यांनी प्रवेश शुल्क 50 रुपये घेण्यास हरकत नसल्याचे सांगितले. खुलासा विचारल्यानंतर प्रवेश अर्ज नि:शुल्क दिले जात आहेत.

अहमदनगर कॉलेज
महाविद्यालयात अकरावीची प्रवेश प्रक्रिया 19 जूनपासून सुरू आहे. महाविद्यालयाकडून माहिती पत्रक कोणत्याही विद्यार्थी किंवा विद्यार्थिनीला दिले जात नाही. केवळ मेरिट फॉर्म विद्यार्थ्यांना अत्यल्पदरात महाविद्यायाने उपलब्ध करून दिले आहे. कृपया या बाबीची नोंद घ्यावी, असा खुलासा अहमदनगर कॉलेजने जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षणाधिकारी परशुराम डापसे यांच्याकडे केला आहे.

रेसिडेन्सिअल महाविद्यालय
अकरावी प्रवेशासंदर्भात आयोजित सभेत दिलेल्या तोंडी सूचनेनुसार राज्य शासन निर्णय इंटरनेटवर शोधला. मात्र, तसा कोणताही निर्णय आढळून आला नाही. 2013-2014 च्या शिक्षण उपसंचालकांनी 50 रुपये शुल्क घेण्याचे परिपत्रकात सांगितले आहे. त्यानुसार प्रवेश अर्ज व माहिती पत्रकासाठी महाविद्यालयाने 50 रुपये शुल्क आकारले आहे.

पेमराज सारडा कॉलेज
अकरावीमध्ये प्रवेश घेण्यास इच्छुक असलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींकडून प्रवेशअर्ज व माहिती पुस्तिका शुल्काबाबत झालेला राज्य शासनाचा नवीन निर्णय इंटरनेटवर उपलब्ध झाला नाही. 2013-2014 मधील अकरावी प्रवेशासाठी आपल्याकडील पत्रानुसार प्रवेश अर्ज व माहिती पुस्तिकांचे शुल्क आकारले होते. 21 जून रोजी राज्य शासन निर्णय उपलब्ध झाल्यानंतर विद्यार्थ्यांना तत्काळ अर्ज मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत.