आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीतिमूल्यांचा वाढता -हास हेच सामाजिक अत्याचारांचे मूळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- वेगाने होणारे आधुनिकीकरण आणि तेवढ्याच वेगाने होणारा संस्कार मूल्यांचा व संस्कृतीचा ऱ्हास हेच भेदभावाचे व सामाजिक अस्थिरतेचे कारण आहे. उपेक्षित व वंचित जनतेच्या मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची व त्यांच्या विकासाची घटनादत्त जबाबदारी शासनाबरोबर समाजातील प्रत्येक घटकाची आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी केले.
जिल्हा नियोजन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, सहायक आयुक्त कार्यालय, समाजकल्याण व सीएसआरडी समाज कार्य व संशोधन संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित अनुसूचित जाती, जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायदा 1989 जाणीव जागृती अभियानाचे उदघाटन जिल्हाधिकारी कवडे यांच्या हस्ते बाबुर्डी बेंद येथे करण्यात आले. यावेळी समाजकल्याणचे सहायक आयुक्त माधव वाघ, सीएसआरडीचे संचालक डॉ. सुरेश पठारे, तसेच बाबुर्डी बेंद येथील सरपंच, उपसरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित सीएसआरडीच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक एकात्मतेचा संदेश देणारे पथनाट्य व समाज प्रबोधनपर गाणी सादर केली.
यावेळी वाघ म्हणाले, अनुसूचित जाती-जमातीसाठी शासनामार्फत वेगवेगळे उपक्रम राबवून वंचित घटकांच्या हक्कांचे संरक्षण व संवर्धन केले जाते. दलित व आदिवासी समुदायासाठी अत्याचार प्रतिबंधक कायदा अत्यंत मूलगामी असून त्याचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे. डॉ. पठारे यांनी सांगितले की, वाढत्या अत्याचारांना आळा घालण्याकरिता व धार्मिक, जातीय सलोख्याचे व एकात्मतेचे वातावरण निर्माण करण्याकरिता सीएसआरडीतील विद्यार्थ्यांच्या मदतीने व्यापक स्वरूपात अभियान राबवण्यात येईल. विद्यार्थी प्रत्येक तालुक्यातील प्रमुख गावात, वाडी-वस्त्यांवर जाऊन कलापथकांच्या माध्यमातून सामाजिक एकात्मतेचा संदेश गावक-यांना देतील.
जिल्हाधिका-यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत येणाऱ्या बाबुर्डी बेंद हे एक सुसंस्कृत गाव बनून दलित आदिवासी घटकांच्या हक्कांच्या संरक्षणाबरोबरच संस्कार केंद्र म्हणून ओळखले जाईल, असे आश्वासन ग्रामस्थांनी यावेळी दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सॅम्युअल वाघमारे यांनी केले. आभार ग्रामस्थ रेवणनाथ चोभे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. विजय संसारे, कैलास जाधव, प्रेरणा विधाते, प्रा. प्रदीप जारे यांच्यासह सीएसआरडीतील विद्यार्थी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले.