आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Collector Anil Kavade,latest News In Divya Marathi

गोदामे तपासून अहवाल सादर करण्याचे जिल्हाधिका-यांचे आदेश धाब्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्ह्यात अन्न सुरक्षा योजनेतील धान्य घोटाळ्याचा पर्दाफाश 'दिव्य मराठी'ने केल्यानंतर जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी 15 सप्टेंबर रोजी सर्व गोदामे तपासून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. पण संबंधित अधिका-यांनी थातूरमातूर कारवाई करत जिल्ह्यातील 18 पैकी अवघ्या दोन गोदामांची तपासणी करून जिल्हाधिका-यांच्या आदेशालाही वाटाणाच्या अक्षता लावल्या. निवडणुकीचे कारण दाखवत धान्य माफियांना अभय देण्यात आल्याचे अधिक माहिती घेता स्पष्ट झाले.
"दिव्य मराठी'ने 11 सप्टेंबर रोजी ह्यदर महिन्याला 25 ट्रक स्वस्त धान्याची लूट' असे वृत्त प्रकाशित केल्यानंतर जिल्ह्यातील धान्य माफियांचे धाबे दणाणले. त्या वृत्तात सरकारी गोदामात धान्याची लूट कशी केली जाते, हे छायाचित्रे व पुराव्यानिशी स्पष्ट केले होते. विशेष म्हणजे, दर महिन्याला होणारी धान्याची लूट सुमारे 40 ते 50 ट्रक होत असल्याची माहिती काही स्वस्त धान्य दुकानदारांनी 'दिव्य मराठी' शी संपर्क साधून दिली. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांचे तर नुकसान होत आहेच, पण सामान्यांचे त्याहून मोठे आहे. मुळात स्वस्त धान्य दुकानदारांना मिळणारे कमिशन कमी आहे. त्यामुळे आलेले धान्य मोजण्यापेक्षा ते गोण्यांनीच ग्राहकांना विकण्यात येते. पन्नास किलोची गोणी मोजण्याची व्यवस्था दुकानदारांकडे नसल्याने ग्राहक दुकानदारावर विश्वास ठेवून ते घरी नेतात. स्वस्त धान्य दुकानांतील धान्य नेणारा वर्ग आर्थिकदृष्ट्या अतिशय निम्न स्तरातील आहे. आपण लुटले गेलो, हेच त्यांना समजत नाही. परिणामी धान्य माफियांचे फावले आहे. त्यांना पुरवठा विभागातील अधिका-यांचा आशीर्वाद असल्याशिवाय हे घडूच शकत नाही. ह्यदिव्य मराठीने ही वस्तुस्थिती मांडली होती.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही या वृत्तावर संतप्त प्रतिक्रिया देत धान्य घोटाळ्याचे रॅकेट उद्ध्वस्त करण्याचे आवाहन केले होते. या गरिबांच्या तोंडाचा घास हिसकावून करण्यात येणाऱ्या धान्य घोटाळ्यात अधिका-यांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वांचे हात असल्याचे अण्णांनी म्हटले होते. या वृत्ताची गंभीरतेने दखल घेत जिल्हाधिका-यांनी 15 सप्टेंबरला कारवाईचा आदेश दिला. गोदामांची अचानक तपासणी करावी. ज्यूटच्या गोणीचे वजन 50 किलो 650 ग्रॅम व प्लास्टिकच्या गोणीचे वजन 50 किलो 116 ग्रॅम भरणे आवश्यक आहे. ज्या गोदामांतील वजन नियमांप्रमाणे भरणार नाही, अशा गोदामांच्या हमाल, ठेकेदार व गोदामपाल यांना जबाबदार धरावे, त्यांच्याकडून बाजारभावाप्रमाणे वसुली करावी, असा आदेश जिल्हा पुरवठा अधिकारी व तहसीलदारांना दिला होता. पण जिल्हाधिका-यांच्या या आदेशाला संबंधित अधिका-यांनी केराची टोपली दाखवली.

स्वस्त धान्याची लूट अद्याप सुरूच
वजन करण्याच्या बहाण्याने ह्यहातसफाईह्ण करून लूट करण्यात येणाऱ्या स्वस्त धान्यात प्रामुख्याने गहू व तांदळाचा समावेश आहे. यातील गहू आटा व जनावरांचे खाद्य तयार करण्यासाठी पाठवला जातो, तर तांदळाला पुन्हा पॉलिश करून तो बाजारात आणला जातो, अशी माहिती जाणकारांनी दिली. यात अधिकारीही अडकल्याने वर्षानुवर्षे हे निर्धोकपणे सुरू आहे.
तपासणी केलेल्या गोदामांत अनियमितता
जिल्हा पुरवठा अधिका-यांनी जिल्ह्यातील 18 पैकी जामखेड व श्रीगोंदे या फक्त दोनच गोदामांची तपासणी केली. त्यात त्या दोनही गोदामांतील पोत्यांच्या वजनात अनियमितता, दोष आढळले. त्‍या दोन गोदामपालांना 'कारणे दाखवा' नोटीस देण्यापलीकडे अद्याप कोणतीही गंभीर कारवाई अधिका-यांनी केलेली नाही. यावरून अधिका-यांचा या प्रश्नाकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्पष्ट होतो.