आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामीण जनतेमध्ये मिसळणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांची भासणार उणीव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - एरवी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात सर्वसामान्य नागरिकांना सहज प्रवेश मिळत नाही. मात्र, १६ फेब्रुवारी २०१४ मध्ये जिल्हाधिकारी म्हणून आलेले अनिल कवडे यांनी सर्वसामान्यांना नेहमीच आपल्या दालनात सहज प्रवेश दिला. लोकांची गाऱ्हाणी, त्यांचे प्रश्न समजून घेत ते सोडवण्यासाठी कवडे यांनी प्रयत्न केले. केवळ दालनात बसूनच नव्हे, तर गाव- खेड्यांमध्ये मुक्कामी राहूनही त्यांनी लोकांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यामुळेच लोकांमध्ये मिसळणारा "कलेक्टर' अशी त्यांची जिल्हाभर ओळख निर्माण झाली होती.
नगर जिल्ह्याचे ६८ वे जिल्हाधिकारी म्हणून अनिल कवडे यांनी दोन वर्ष काम केले. या कालावधीत त्यांनी जलयुक्त शिवार योजना यशस्वीपणे राबवली. ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकापर्यंत सरकारी योजना पोहोचली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. त्यासाठी त्यांनी दोन वर्षांच्या कालावधीत संपूर्ण जिल्ह्यात अनेकवेळा दौरे केले. खेड्यापाड्यातील लोकांचे प्रश्न, त्यांची गाऱ्हाणी त्यांनी नेहमीच ऐकून घेतली. खेड्यापाड्यात जाऊन तेथे मुक्कामी राहणारा कलेक्टर जिल्ह्यातील लोकांनी प्रथमच पाहिला. आपले काम घेऊन आलेल्या सर्वसामान्यांसाठी कवडे यांचे दालन नेहमीच उघडे असायचे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकही त्यांना आपला कलेक्टर म्हणूनच ओळखायचे. त्यांच्या उपस्थितीत पार पडणारा कोणताही कार्यक्रम असो, तेथे समाज प्रबोधनावर दोन शब्द बोलल्याशिवाय कवडे यांना चैन पडत नाही. दारूबंदी, हुंडा बंदी, पाणी बचत, अशा एक ना अनेक विषयांवर कवडे यांचा गाढा अभ्यास आहे. त्यातूनच समाज प्रबोधन करण्याचे काम त्यांनी वेळोवेळी केले. लोकांनाही त्यांचे विचार मनपासून आवडले. एखाद्या गावात जाऊन तेथील लोकांना व्यायाम, दारूबंदी याचे महत्त्व पटवून देत, मी पुन्हा आपल्या गावात येईल, तेव्हा मला हे गावाचे चित्र बदललेले दिसले पाहिजे, असे सांगण्यासही ते कधी विसरले नाहीत. या आपुलीकीच्या वागण्यामुळे लोकांना कवडे नेहमीच आपलेसे वाटले. त्यांच्या बदलीमुळे जिल्ह्यातील सर्वसामान्य लोकांना त्यांची उणीव नक्कीच भासणार आहे.

कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मकता वाढीसाठी दिले योगदान
जिल्हाधिकारीकवडे यांना राज्याच्या एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या आयुक्तपदी बढती मिळाली आहे. कवडे यांनी सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात सकारात्मकता वाढावी, यासाठी कोपरगाव येथे राज्यातील पहिले प्रशिक्षण केंद्र सुरु केले. या केंद्रात आतापर्यंत हजारो कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षण घेतले. त्यामुळे सरकारी कामकाजात सुलभता आली. शिवाय महसूल उत्पन्नातही कवडे यांनी नेहमीच चांगले कार्य केले. चालू वर्षी तब्बल ११० कोटींचे महसुली उत्पन्न त्यांच्या प्रयत्नांमुळे जमा झाले. जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. बालविकास प्रकल्पाचे आयुक्त म्हणूनही ते चांगले काम करतील.