आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दीड हजार विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया रखडली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दाखल्यांसाठी होणार्‍या गर्दीला कंटाळून तहसील कार्यालयासमोर असलेले सेतू कार्यालय कुठलीही पूर्वसूचना न देता तहसील कार्यालयात हलवण्यात आले. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचा मोठा गोंधळ उडाला. दरम्यान, ‘सेतू’तून दाखले मिळत नसल्यामुळे दीड हजारांहून अधिक विद्यार्थ्यांचे महाविद्यालयीन प्रवेश रखडले आहेत.

सर्व प्रकारचे दाखले एकाच ठिकाणी मिळावेत, या हेतूने प्रशासनाने सेतू कार्यालय सुरू करून तेथे दाखले उपलब्ध करून देण्याची व्यवस्था केली. प्रशासनाने हे काम कंत्राटदारांना दिले आहे. पण कंत्राटदार व प्रशासनाच्या मनमानीचा फटका विद्यार्थी व पालकांना सहन करावा लागत आहे.

सावेडी परिसरासाठी तहसील कार्यालयासमोरील सेतू कार्यालयातून दाखल्यांचे वाटप केले जाते. सध्या अकरावी व महाविद्यालयाच्या प्रथम वर्षाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. दाखले घेण्यासाठी पालक व विद्यार्थी सेतू कार्यालयात येतात. मात्र, लगेच हे दाखले दिले जात नाहीत. अनेकदा चकरा मारूनही दाखले मिळत नसल्याने विद्यार्थी व पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो. उत्पन्न, जात, नॉन क्रिमीलेअर या दाखल्यांसाठी अनेकांनी तीन महिन्यांपासून अर्ज केले आहेत. मात्र, स्वाक्षर्‍या न झाल्याने दाखले पडून आहेत. अर्ज आल्यानंतर महिन्याभरात दाखले देणे बंधनकारक आहे.

सेतू कार्यालयासमोर होणार्‍या गर्दीमुळे मोठा गोंधळ उडत होता. त्यामुळे प्रशासनाने हे कार्यालय तहसील कार्यालयात हलवले. अनेक विद्यार्थी व पालक जुन्या कार्यालयात येतात. तेथे टाळे लावलेले दिसते. त्यामुळे कोठे जायचे असा प्रश्न पडतो.

सेतूच्या कारभारावर प्रशासनाचा कुठलाही वचक राहिलेला नाही. दाखल्यांची मागणी केल्यानंतर स्वाक्षर्‍या झाल्या नाहीत, नंतर या, आमच्याकडे अर्ज आला नाही, अशी उडावाउडवीची उत्तरे दिली जातात. सर्वसामान्यांना दाखल्यांसाठी तीन-तीन महिने फिरावे लागते. एजंट मात्र चिरीमिरी घेऊन दोन मिनिटांत दाखला आणून देतात.
सेतू कार्यालय बंद करा
४अकरावीच्या प्रवेशासाठी जातीचा दाखला आवश्यक असल्याने 10 जूनला अर्ज केला होता. मागील तेरा दिवसांपासून चकरा मारतो आहे. कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. दोन दिवसांत दाखला मिळाला नाही, तर प्रवेश मिळणार नाही. दाखले मिळत नसतील, तर सेतू बंद करा.’’
- गौरव झिंजुर्डे, विद्यार्थी.
उद्या शेवटची मुदत
४जातीचा दाखला मिळावा, यासाठी 30 मे रोजी तहसील कार्यालयात अर्ज केला होता. मागील महिन्याभरापासून सेतू कार्यालयात येत आहे. दाखल्याची मागणी केल्यावर तेथील कर्मचारी अजून स्वाक्षर्‍या झाल्या नाहीत, नंतर या असे सांगतात. प्रवेशासाठी उद्या शेवटची मुदत आहे. ’’
- अभिषेक बोज्जा, विद्यार्थी.
प्रवेश मिळणार नाही...
४मुलाला पुण्यातील इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आहे. जातीच्या दाखल्यासाठी दोन महिने अगोदर अर्ज केला होता.दररोज सेतू कार्यालयात येत आहे. मात्र, तहसील कार्यालयातून अजून दाखला आला नाही, असे कर्मचारी सांगतात. दाखला मिळाला नाही, तर मुलाला प्रवेश मिळणार नाही.’’
- उर्मिला दहिवाल, पालक.
तारखेवर तारीख...
४इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी दाखला हवा असल्यामुळे महिन्याभरापूर्वीच अर्ज केला होता. सेतू कार्यालयातील कर्मचारी या तारखेला या, त्या तारखेला या, असे सांगून वेळ मारून नेतात. अनेक चकरा मारल्या, पण दाखला काही मिळाला नाही. दाखल्यासाठी आले की, इकडे नाही, तिकडे जा, असे कर्मचारी सांगतात.’’
सायली शिंदे, विद्यार्थिनी.
छायाचित्र - शाळा, महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी लागणारे विविध दाखले घेण्यासाठी सध्या सेतू कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. छाया - गजानन कुलकर्णी