नगर- अकरावी प्रवेश अर्जाचे शुल्क घेऊ नये, असे आदेश राज्य शिक्षण विभागाने दिले आहेत. तथापि, जिल्ह्यातील अनेक महाविद्यालयांनी हे आदेश धाब्यावर बसवून प्रवेश अर्जाची शुल्क वसुली सुरू केली आहे. नियमबाह्य शुल्क परत करावे, अशी मागणी युगंधर युवा प्रतिष्ठानने शनिवारी माध्यमिक शिक्षणाधिका-यांकडे केली.विद्यार्थ्यांकडून सर्रास 50 ते 80 रुपये अर्जाच्या नावाखाली उकळले जात आहेत. त्याची कोणतीही पावती दिली जात नाही. माध्यमिक विभागाने त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही.
त्यामुळे संतप्त झालेल्या ‘युगंधर’च्या कार्यकर्त्यांनी शिक्षणाधिका-यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. शिक्षणाधिकारी उपस्थित नसल्याने रिकाम्या खुर्चीला हार घालून गांधीगिरी केली. त्यानंतर शिक्षणाधिका-यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतली. प्रवेश अर्जाच्या नावाखाली सुरू असलेली लूट थांबवावी, तसेच घेतलेले शुल्क परत करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणीही प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली. यावेळी संघटनेचे अध्यक्ष प्रदीप ढाकणे, सचिन आंबेडकर, राहुल रासकर आदी उपस्थित होते.