आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साडेचारशे कॉलेज युवतींचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- महिला सबलीकरणासाठी केवळ निर्णय घेऊ नका, तर त्या निर्णयाची कठोर अंमलबजावणी करा व प्रबोधनपर कार्यक्रम आयोजित करा, या मागणीसाठी अहमदनगर महाविद्यालयाच्या साडेचारशे विद्यार्थिनींनी सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेला. महाविद्यालयात सध्या महिला सबलीकरण सप्ताह साजरा केला जात आहे. त्याचा एक भाग म्हणून हा मोर्चा काढण्यात आला.

नगर महाविद्यालयाच्या संगणक विभागातर्फे आयोजित महिला सशक्तीकरण सप्ताहाचे उद्घाटन प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून करण्यात आले. यावेळी उपप्राचार्य डी. बी. मोरे, डॉ. सोमवंशी, रजिस्ट्रार ए. वाय. बळीद, विभागप्रमुख रज्जाक सय्यद यांच्यासह विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. नंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा निघाला. महाविद्यालयापासून निघालेला हा मोर्चा घोषणा देत बंगाल चौकीमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर येऊन धडकला.

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महिला सबलीकरणासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न होतात. पण, तरीही समाजाचा दृष्टिकोन बदलायला तयार नाही. तो बदलण्यासाठी शासनाकडून आणखी प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन होण्याची गरज आहे. स्त्री-भ्रूणहत्या रोखण्यासाठी केवळ सोनोग्राफी सेंटरवर छापे टाकून व बंदी घालून चालणार नाही, तर हुंडाबंदी कायद्याची कठोर अंमलबजावणी व्हायला हवी. स्त्री-संरक्षणविषयक कायदे व त्यांची अंमलबजावणी अधिक सजगपणे व्हावी.

स्त्रियांवरील अत्याचारांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. याबाबत स्वतंत्र द्रूतगती न्यायालयांची स्थापना करून महिलांना तातडीने न्याय मिळवून द्यायला हवा, तसेच भावना भडकावणार्‍या प्रसारमाध्यमांवरील सेन्सॉरशिप कडक करायला हवी. पुरुषी मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. महिला जागृती अभियानाला अधिक पाठबळ मिळावे, या निवेदनावर महाविद्यालयाच्या सुमारे सव्वाचारशे विद्यार्थिनींच्या सह्या आहेत