आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कष्टकर्‍यांच्या हाती सूत्रे आली तरच जग वाचेल- भालचंद्र केरकर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- वाढती महागाई, बेकारी, खासगीकरण, पर्यावरणाचा र्‍हास या पार्श्वभूमीवर कामगार, कष्टकर्‍यांच्या हातात सूत्रे आली, तरच जग वाचेल, असे उद्गार लाल निशाण पक्षाच्या (लेनिनवादी) सचिव मंडळाचे सदस्य कॉम्रेड भालचंद्र केरकर यांनी काढले. कॉम्रेड मधुकर कात्रे यांच्या चतुर्थ स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

केरकर म्हणाले, नगर जिल्ह्याचा कामगार चळवळीचा इतिहास जाज्वल्य आहे आणि तो मधुकर कात्रे यांच्या संदर्भाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. कात्रे व लाल निशाण पक्षाचे नेते ज्या स्वप्नांसाठी लढले, जो विचार त्यांनी अंगीकारला, तो विचार जिवंत ठेवणे व त्याचे आचरण व्यवहारात आणणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

बहुजन समाजाचे, विशेषत: कामगारांचे हक्क काढून घेण्याचे चुकीचे धोरण सध्या राबवले जात आहे. त्याबाबत नुसत्या भारतातच असंतोष खदखदतोय असं नाही, तर दक्षिण अमेरिकेत, ग्रीसमध्ये लोक साम्राज्यशाही, भांडवलशाहीला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत. अशा वातावरणात आपणच राज्यकर्ते व्हायची गरज आहे. लोकांनी, लोकांसाठी लोकांचे राज्य या अब्राहम लिंकन यांच्या व्याख्येप्रमाणे लोकशाहीची प्रतिष्ठापना होण्याची गरज आहे. काही मूठभरांकडे प्रचंड संपत्ती आहे आणि दुसरीकडे जगातले 100 कोटी लोक उपाशी झोपतात. ही विषमता दूर करण्यासाठी चळवळ करणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

कॉ. मधुकर कात्रे सर्मपित कामगार कार्यकर्ता पुरस्कार पुणे महापालिका कामगार युनियनचे अध्यक्ष कॉ. डी. एस. देशपांडे यांना देण्यात आला. पाच हजार रुपये, मानपत्र, मानचिन्ह, शाल, र्शीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

सत्काराला उत्तर देताना देशपांडे म्हणाले, कामगारांबद्दल असलेल्या माझ्या तळमळीला, आत्मियतेला व केलेल्या कामाला मिळालेली ही पावती आहे, असे मी समजतो.

याप्रसंगी कॉ. बाबा आरगडे, राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष योगिराज खोंडे, बबनराव पवार, रामनाथ वाघ, र्शीधर आदिक, वसंतराव पराडकर, भालचंद्र आपटे, सौदामिनी कात्रे, सुभाष कुलकर्णी, अनंत लोखंडे आदींनी आपले विचार व्यक्त केले. मानपत्राचे वाचन प्रा. सुनील कात्रे यांनी केले. कामगार चळवळीची गाणी लोखंडे व कोंडा यांनी सादर केली. सूत्रसंचालन आनंद वायकर यांनी केले.