आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांचा वचक न उरल्यानेच हत्याकांडे, जवखेडेप्रकरणी लक्ष्मणराव ढोबळे यांची प्रतिक्रिया

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्ह्यात पोलिसांचा वचक न उरल्यानेच जवखेडेसारखी दलितांची क्रूर हत्याकांडे घडत आहेत. पोलिसांची कार्यपद्धती गुंड व अपप्रवृत्तींना मोकळीक देणारी आहेत, असा आरोप माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी बुधवारी नगरमध्ये 'दिव्य मराठी'शी बोलताना केला.
जवखेडे येथील तिहेरी हत्याकांडाला 15 दिवस उलटून गेले आहेत, तरीही पोलिसांना अद्याप आरोपी सापडलेले नाहीत. कदाचित त्यांना नावे कळली असतील, पण ती त्यांनी जाहीर केलेली नाहीत. पोलिसांनी योग्य दिशेने तपास करावा, यासाठी दलित संघटनांनी संयम पाळून सनदशीर मार्गाने आंदोलन सुरू ठेवले आहे, तरीही काहीही फायदा होत नाही. त्यामुळे दलित संघटनांचा संयम तुटण्याची भीती ढोबळे यांनी व्यक्त केली. नगर जिल्ह्यातच सोनई, खर्डा, जवखेडे यांसारखी हत्याकांडे का घडतात, याचा विचार करण्याची गरज व्यक्त करून ते म्हणाले, की वरील तिन्ही हत्याकांडांची परिस्थिती एक सारखी आहे. एका हत्याकांडाचे अद्याप आरोपपत्र दाखल झालेले नाही. एका हत्याकांडात मुलाचा शवचिकित्सेचा अहवाल वडिलांना मिळण्यासाठी संघर्ष करावा लागला. जवखेडेसारखे निर्घृण व क्रौर्याची परिसीमा गाठणाऱ्या हत्याकांडातील आरोपींचा माग लागत नाही. या वरून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्हे उभी राहतात. सोनई हत्याकांड झाल्यानंतर पोलिसांनी योग्य पद्धतीने तपास करून आरोपींना जरब बसणारा तपास केला असता, तर कदाचित पुढील म्हणजे खर्डा व जवखेडेसारख्या घटना घडल्या नसत्या. आता पोलिसांनी योग्य व जलद गतीने तपास करून आरोपींना पकडण्याची गरज आहे. त्यांनी दलित संघटनांच्या संयमाचा अंत पाहू नये, असे आवाहनही ढोबळे यांनी केले.