आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपायुक्त चारठाणकर हजर, अतिक्रमण हटाव मोहीम शहरात पुन्हा होणार सुरू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - गेल्या काही दिवसांपासून थंडावलेली अतिक्रमण हटाव मोहीम पुन्हा दणक्यात सुरू होणार आहे. उपायुक्त अजय चारठाणकर यांच्या नेतृत्वाखाली महिनाभर अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली. परंतु चारठाणकर दीर्घ रजेवर गेल्याने ही मोहीम थंडावली होती. परंतु आता चारठाणकर पुन्हा कामावर हजर झाल्याने ही मोहीम पुन्हा दणक्यात सुरू होणार आहे. अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच राहणार असल्याचे चारठाणकर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
शहरातील प्रमुख अंतर्गत रस्त्यांवरील लहान-मोठ्या अतिक्रमणांमुळे शहराचा श्वास कोंडला होता. चारठाणकर यांनी तब्बल महिनाभर अतिक्रमण हटाव मोहीम राबवून हजारो अतिक्रमणे हटवली. नगरकरांनी या मोहिमचे उत्स्फूर्त स्वागत केले. मात्र, पंधरा दिवसांपूर्वी चारठाणकर रजेवर गेल्यानंतर ही मोहीम थंडावली होती.
आयुक्त विजय कुलकर्णी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी या मोहिमेकडे दुर्लक्ष केले. अतिक्रमण विभागप्रमुख सुरेश इथापे यांनी मोहीम सुरू ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यासाठी त्यांना प्रभाग अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळाले नाही. हा वाद थेट आयुक्तांपर्यंत पोहोचला, त्यानंतर कशीबशी सुरू झालेली ही मोहीम फारशी प्रभावी ठरली नाही. ज्या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात आले, तेथे पुन्हा अतिक्रमण झाले.
चारठाणकर रजेवर असल्याचे पाहून अनेकांनी रस्त्यावर पथारी मांडली. त्यामुळे आतापर्यंत राबवण्यात आलेल्या मोहिमेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. मात्र, रजेवर गेलेले चारठाणकर सोमवारी पुन्हा कामावर हजर झाले आहेत. त्यामुळे अतिक्रमणधारकांचे पुन्हा धाबे दणाणले आहेत. चारठाणकर यांनी देखील कामावर हजर होताच मोहीम सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट केले. मंगळवारी महाशिवरात्रीनिमित्त सुटी आहे, त्यामुळे मनपाचे अतिक्रमण हटाव पथक बुधवारपासून (१८ फेब्रुवारी) पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. चारठाणकर स्वत: कारवाईच्या ठिकाणी हजर राहणार आहेत. त्यामुळे ही मोहीम पुन्हा दणक्यात सुरू होणार, यात शंका नाही.
पुन्हा विरोधाची शक्यता

मनपाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेच्या विरोधात पंचायत विकास समितीतर्फे नुकतीच निदर्शने करण्यात आली. मनपाने फेरीवाले पुनर्वसन कायद्याची अंमलबजावणी करावी, मगच अतिक्रमण मोहीम राबवावी, अशी मागणी पंचायतीतर्फे करण्यात आली. त्यामुळे पुन्हा प्रभावीपणे सुरू होणाऱ्या अतिक्रमण हटाव मोहिमेस पंचायतीचा विरोध होण्याची शक्यता आहे.
आतापर्यंत मोहीम यशस्वी

महापालिकेने आतापर्यंत अनेकवेळा अतिक्रमण हटाव मोहीम राबवली, परंतु प्रत्येक वेळी ही मोहीम नावापुरतीच ठरली. चारठाणकर यांनी मात्र स्वत: मोहिमेचे नियोजन करून ती यशस्वीपणे राबवली. सुरुवातीला आयुक्त विजय कुलकर्णी, अतिरिक्त आयुक्त विलास वालगुडे, उपायुक्त भालचंद्र बेहेरे स्वत: मोहिमेत सहभागी झाले, परंतु त्यानंतर संपूर्ण मोहीम चारठाणकर यांनीच राबवली.