आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वसामान्यांचे नेतृत्व हरपले...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - बहुआयामीनेते गोविंदराव आदिक यांच्या निधनाने जिल्ह्याचे सर्वसामान्यांचे नेतृत्व हरपल्याची भावना गुरुवारी सहकार सभागृहात आयोजित सर्वपक्षीय श्रद्धांजली सभेत व्यक्त करण्यात आली. पालकमंत्री राम शिंदे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत आदिक यांच्या आठवणींना उजाळा देत श्रद्धांजली वाहण्यात आली.

विखे म्हणाले, जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेल्या गोविंदराव आदिक यांनी आपल्या कार्याचा ठसा राज्यातच नव्हे, तर देशात उमटवला. शेतकरी सामान्य कार्यकर्त्यांना एकत्रित आणत त्यांनी कृषक समाजाची स्थापना केली. या माध्यमातून त्यांनी शेतक-यां च्या प्रश्नांना वाचा फोडून ते मार्गी लावण्याचा शेवटपर्यंत प्रयत्न केला. अनेक उपेक्षित कामगारांना जवळ करत त्यांनी त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला. उपेक्षित कामगारांना एकत्रित आणण्याचे त्यांचे कार्य महत्त्वाचे ठरले.

पालकमंत्री शिंदे म्हणाले, कोणताही सामान्यातला सामान्य कार्यकर्ता त्यांच्याकडे गेला, तरी ते त्याला जवळ करत. आपुलकीने प्रश्न समजावून घेत आपल्या पद्धतीने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत. त्यांनी कधीही कोणाला निराश केले नाही. प्रत्येकजण आपापला गड राखण्याचा प्रयत्न जिल्ह्यात करतो. मात्र, त्यांनी श्रीरामपूर मतदारसंघाबरोबर इतरत्रही व्यवस्थित लक्ष दिले. त्यामुळेच ते वैजापूर मतदारसंघातून निवडून येऊ शकले.

आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले, आदिक यांच्या रुपाने सर्वसामान्यांचा नेता हरवला आहे. सध्याच्या कार्यकर्त्यांचा भरवसा नाही. कधी कोणता कार्यकर्ता कोणाकडे जाईल, याची खात्री नसते. अशा परिस्थितीत आदिक यांनी कार्यकर्त्यांची फळी कायम जपली. कार्यकर्त्यांना कसे जपावे, याचा आदर्श त्यांनी घालून दिला.

माजी मंत्री बबनराव पाचपुते म्हणाले, आदिक यांच्या जाण्याने जिल्ह्याचे नेतृत्व हरपले. शेतकरी कामगारांसाठी त्यांनी भरीव काम केले. त्यांच्या या कार्यामुळेच जिल्ह्याची ओळख सर्वदूर पोहोचली.

जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड, महापौर अभिषेक कळमकर, आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, आमदार भाऊसाहेब कांबळे, आमदार वैभव पिचड, आमदार मोनिका राजळे, आमदार संग्राम जगताप, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग अभंग, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, माजी आमदार चंद्रशेखर घुले, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रामनाथ वाघ, काँग्रेसचे प्रभारी शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, माजी आमदार नरेंद्र घुले, विनायक देशमुख, अविनाश आदिक यांच्यासह कृषक समाज, इंटक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

दिवंगत ज्येष्ठ नेते गोविंदराव आदिक यांना गुरूवारी सर्वपक्षीय आदरांजली वाहण्यात आली. यावेळी बोलताना पालकमंत्री राम शिंदे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, अविनाश आदिक, आमदार शिवाजी कर्डिले, महापौर अभिषेक कळमकर यांच्यासह विविध पक्षांचे नेते कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...