आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वैद्यकीय क्षेत्रात स्पर्धा वाढेल, डॉ. परवेझ ग्रँड यांचे प्रतिपादन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- वैद्यकीय क्षेत्रात भविष्यात भांडवली कंपन्यांचा शिरकाव होणार आहे. त्यांच्याशी स्पर्धा करण्याची तयारी करावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलसाठी उत्तम सेवेसोबतच उत्तम व्यवस्थापनाची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. परवेझ ग्रँड यांनी केले.
आयएमएस संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या "डिप्लोमा इन हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन' अभ्यासक्रमातील यशस्वितांना पदविका प्रदान करण्यासाठी आयोजित समारंभात ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष डॉ. एन. एम. अॅस्टन, सरसंचालक डॉ. शरद कोलते, संचालक डॉ. एम. बी. मेहता, अभ्यासक्रम संचालिका डॉ. श्वेता प्रभाकर, समन्वयक डॉ. अभिजित मंचरकर आदी या वेळी उपस्थित होते. डॉ. ग्रँड म्हणाले, डॉक्टर, कर्मचारी व रुग्ण यांच्याशी समन्वय साधण्याचे कठीण काम व्यवस्थापकाला करावे लागते. त्यांच्याकडून चुका घडल्यास समजून घेण्याची तयारी ठेवली पाहिजे. त्यांना योग्य अधिकार देऊन त्यांच्यावर विश्वास ठेवणे आवश्यक आहे. हॉस्पिटलची सेवा परिपूर्ण होण्यासाठी नवीन तंत्रज्ञान, आधुनिक मशिनरी व अत्याधुनिक साहित्य गरजेच्या आहेत.

स्वत:च्या क्षमता ओळखून रुग्णांच्या आर्थिक क्षमतेचा अंदाजही करता आला पाहिजे. मेडिकल टुरिझमच्या माध्यमातून भविष्यात हॉस्पिटल क्षेत्रात मोठ्या संधी आहेत. त्यासाठी उत्तम व्यवस्थापन विश्वास निर्माण करण्याची गरज आहे, असे डॉ. ग्रँड म्हणाले. रुग्ण व नातेवाइकांची मानसिकता, सवलत मागण्याची सवय, आधुनिक मशिनरीची गरज व महत्त्व, रुबी हॉलच्या यशाचे गमक याविषयीचे अनुभवही त्यांनी कथन केले. स्वागत डॉ. एम. बी. मेहता यांनी केले. डॉ. अभिजित मंचरकर यांनी सूत्रसंचालन केले. संचालक डॉ. सुरेश पठारे, रमेश फिरोदिया, किशोर मुनोत, रामनाथ वाघ, डॉ. रविंद्र सोमाणी, डॉ. अभिजित पाठक, डॉ. बन्सी शिंदे आदी उपस्थित होते.

डॉ. पाठक प्रथम
डिप्लोमा इन हॉस्पिटल अॅडमिनिस्ट्रेशन या पदविका अभ्यासक्रमात डॉ. रेणुका पाठक यांनी संस्थेत प्रथम क्रमांक पटकावला. डॉ. स्मिता शिंदे यांनी द्वितीय, तर डॉ. मृणाल वाघ यांनी तृतीय क्रमांक मिळवला. या अभ्यासक्रमाची नवीन बॅच फेब्रुवारीमध्ये सुरू होणार असून अधिक माहितीसाठी महेश दीक्षित यांच्याशी ९२७१२२५१०६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.