आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Competitive Examination Guideline At Ahemdnagar Municipal Corporation

अहमदनगर मनपा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे कार्य कौतुकास्पद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- महापालिकेच्या स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा अनेक गरजू व गोरगरीब विद्यार्थ्यांना लाभ होत आहे. या केंद्राच्या माध्यमातून अनेक सर्वसामान्य विद्यार्थी उच्च अधिकारी झाले आहेत. केंद्राचे काम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन महापौर शीला शिंदे यांनी केले.

स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे संचालक एन. बी. मिसाळ यांनी एमपीएससी विद्यार्थ्यांसाठी लिहिलेल्या ‘एमपीएससी सीसॅट’ पुस्तकाचे प्रकाशन गुरुवारी महापौरांच्या दालनात करण्यात आले. याप्रसंगी महापौर बोलत होत्या. यावेळी आयुक्त विजय कुलकर्णी, उपमहापौर गीतांजली काळे, प्रभारी उपायुक्त संजीव परशरामी, नगररचनाकार विश्वनाथ दहे, माजी नगरसेवक अनिल शिंदे, बाबू चोरडिया, राजेश लयचेट्टी, शेखर देशपांडे आदी उपस्थित होते.

महापौर म्हणाल्या, मिसाळ यांच्याकडून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रातील विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळत आहे. आपल्या कार्याचा भाग म्हणूनच त्यांनी हे पुस्तक लिहिले आहे. शासनाच्या निधीमधून लवकरच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी अद्ययावत इमारत उभारण्यात येणार आहे. त्यामुळे हे केंद्र अद्ययावत होऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार असल्याचे महापौरांनी सांगितले.

आयुक्त कुलकर्णी म्हणाले, मुलाखतीस गेल्यानंतर अनेकदा विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देताना अडचणी येतात. ही अडचण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून सोडवण्यासाठी विद्यार्थ्यांना लाभ होईल. सन 2007 पासून या केंद्राचे काम प्रा. मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य तर्‍हेने सुरू असल्याचे सांगून या केंद्रास संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन आयुक्तांनी दिले.

मिसाळ म्हणाले, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासाठी मनपाचे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, नगरसेवक सर्वांचेच सहकार्य मिळते आहे. आतापर्यंत अनेक कथा-कादंबर्‍या लिहिल्या, नाटकांतही अभिनय केला. परंतु स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या माध्यमातून संचालक या नात्याने करीत असलेले काम जीवनात सर्वांत जास्त आनंददायक आहे.