आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कातड्र येथे कॉम्प्रेसरच्या स्फोटात एकजण ठार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर-राहुरी तालुक्यातील कातड्र शिवारात विहिरीचे काम सुरू असताना कॉम्प्रेसरचा स्फोट होऊन एकजण जागीच ठार झाला, तर दोनजण गंभीर जखमी झाले. शुक्रवारी दुपारी साडेतीन वाजता ही दुर्घटना घडली. याप्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कातड्र येथील शंकर बजाबा तोडमल यांच्या विहिरीचे काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. शुक्रवारी विहिरीचे काम करण्यासाठी कॉम्प्रेसर आणले होते. ‘फायर’ दिल्यानंतर कामगार सुंदरबापू लक्ष्मण चौधरी (38, कातड्र) कामाचे साहित्य कॉम्प्रेसरच्या पेटीत ठेवत होता. तेवढय़ात गरम झालेल्या कॉम्प्रेसरचा स्फोट झाला. या स्फोटात चौधरी जागीच ठार झाले, तर दोनजण गंभीर जखमी झाले. जखमींना जवळच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्फोटाची तीव्रता मोठी असल्याने कॉम्प्रेसरचे दोन्ही पाइप वितळले. स्फोट झाल्यानंतर दीड ते दोन तासांनी पोलिस घटनास्थळी पोहोचले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू होती.
बागायती शेती फुलवण्यासाठी मोठय़ा प्रमाणात विहिरीची कामे सुरू आहेत. विहिरीतील कठीण खडक फोडण्यासाठी कॉम्प्रेसर ब्रेकर मशिनचा वापर केला जातो. पण ही यंत्रणा सुरक्षितरित्या हाताळली जाते किंवा नाही यावर सरकारचे कोणतेही नियंत्रण नसते. ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणात कॉम्प्रेसर मशिन वापरले जाते. तथापि, कोणत्याही कर्मचार्‍याला अधिकृत प्रशिक्षण दिले जात नसल्याने अशा घटना घडतात.