आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झेडपीच्या शाळांमधील संगणक धूळ खात पडून

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यातील साडेतीन हजारांवर जिल्हा परिषद शाळांमध्ये लोकसहभागातून संगणक उपलब्ध करण्यात आले, पण अनेक शाळांमध्ये विजेचे कनेक्शन नाही. वीज कनेक्शन आहेत, त्यापैकी बहुतेक शाळांकडे शैक्षणिक सॉफ्टवेअर नाही. जिल्ह्यातील ७५ शाळांचा विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी सौर यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेण्यात आला, पण मुदत संपूनही ठेकेदाराने ही यंत्रणा बसवलेली नाही. त्यामुळे शेकडो शाळांमधील संगणक फक्त शोभेची वस्तू बनले आहेत. जि. प. शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी विविध उपाययोजना केल्याचा दावा करण्यात येतो. तथापि, प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे हा दावा फोल ठरू लागला आहे.

लोकसहभागातून शाळांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांच्या पुढाकाराने घेण्यात आला. खासगी शाळांच्या देणगीच्या झोळीत पैसे टाकण्याची आर्थिक परिस्थिती नसलेल्या गरीब पालकांचा जिल्हा परिषद शाळांकडे कल आहे. विनामूल्य शिक्षण पद्धतीमुळे जिल्हा परिषद शाळा पट घसरत असला तरी तग धरून आहेत. मुलांना दर्जेदार संगणकीय शिक्षण मिळावे, यासाठी अनेक पालकांनी तसेच ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन शाळांना संगणक खरेदी करून दिले. लोकसहभागातून हजार ५०० शाळांमध्ये संगणक उपलब्ध करण्याचा उपक्रम यशस्वी झाला.

संगणकाचा उपक्रम राबवत असताना किती शाळांमध्ये वीज कनेक्शन आहे, याची माहिती घेण्याची तसदी कोणी घेतली नाही. अनेक शाळांमध्ये वीज कनेक्शन नाही. जेथे कनेक्शन होते, तेथील थकबाकी भरल्यामुळे ते कट करण्यात आले. अशा ठिकाणी संगणक दिल्याने ती फक्त शोभेची वस्तू बनली आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड यांनी आैरंगाबाद येथे झालेल्या एका बैठकीत शाळांना, तसेच पाणी योजनांना घरगुती दराने वीज बिल आकारण्याची मागणी केली होती. पण त्यांच्या प्रयत्नांना अजून यश आलेले नाही.

आजही अनेक शाळांमध्ये वीज नाही. हा गंभीर प्रश्न लक्षात घेऊन जि. प. उपाध्यक्ष अण्णा शेलार यांनी ७५ जिल्हा परिषद गटांमधील प्रत्येकी एक शाळा निवडून तेथे सौर यंत्रणा बसवण्याचा निर्णय घेतला. शिवचैतन्य लाइट िसस्टिम एजन्सीला या कामाचा ठेका देण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली. तथापि, मुदत संपली तरी सौर यंत्रणा बसवण्यात आली नसल्याचे ‘दिव्य मराठी’ने माहिती घेतल्यानंतर निदर्शनास आले. जिल्हा शिक्षणाधिकारी अशोक कडूस यांनी संबंधित ठेकेदाराला तातडीने सौर यंत्रणा बसवण्याची तंबी दिली आहे. तसे लेखी पत्रही ठेकेदाराला पाठवण्यात आल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली.
मुदतीत काम झाले नसले, तरी जि. प. पदाधिकारी गप्प आहेत. संगणक वापरात नसल्याने ते नादुरुस्त झाले असल्याचीही चर्चा सुरू झाली आहे. पण नेमके किती संगणक नादुरुस्त झाले, याची माहिती शिक्षण विभागाकडे नाही. प्रशासनाच्या या ढिम्म कारभारावर सामान्य नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.

शाळांमधील संगणक
३६००संगणकीकृत शाळा
११०० शैक्षणिक सॉफ्टवेअर
७५ नियोजित सोलर सिस्टिम
७७,७०,००० सोलरसाठीचा खर्च

इतर शाळांनाही गरज
सौरयंत्रणा ही खर्चिक बाब आहे. नगर जिल्ह्यात हजार ६०० जिल्हा परिषद शाळा आहेत. त्यापैकी ज्या शाळांमध्ये वीज नाही, अशा शाळांची अडचण होते. सौर यंत्रणा प्रायोगिक तत्वावर ७५ गटांमध्ये प्रत्येकी एका शाळेत लावली जाणार आहे. उर्वरित शाळांबाबत जिल्हा परिषदेने सध्यातरी निर्णय घेतलेला नाही.

ठेकेदारावर मेहेरबानी
सौरयंत्रणा बसवण्यासाठी २५ मार्च २०१५ रोजी ठेका देण्यात आला. या कामाची मुदत तीन महिने होती. मुदत संपली, तरी नियोजित शाळांवर सौर यंत्रणा बसवण्यात आलेली नाही. ठेकेदाराच्या मागणीनुसार २० जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. पण ही मुदतही संपली, तरी अजूनही काम पूर्ण झाले नाही. ठेकेदारावर अधिकारी आणि जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची मेहेरबानी का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

...अन्यथा आंदोलन करू
^संगणकीकरणझाले, पण सॉफ्टवेअर सर्व शाळांना दिले गेले नाही. अनेक ठिकाणी वीज कनेक्शन कट झाले. संगणक वापरात नसल्याने नादुरुस्त होण्याची शक्यता आहे. सौर यंत्रणा बसवण्याचा चांगला निर्णय घेतला, पण त्याची अंमलबजावणी होत नाही. हे असे करणे चालणार नाही. दर्जेदार शिक्षणासाठी आम्ही आंदोलन करू.'' प्रवीणघुले, जिल्हापरिषद सदस्य.

अडीच हजार शाळा वंचित
लोकसहभागातूनहजार ६०० शाळांत संगणक बसवण्यात आले. पण प्रशिक्षण देण्यासाठी अवघ्या हजार १०० शाळांमध्येच सॉफ्टवेअर देण्यात आले आहे. सुमारे हजार ५०० शाळा सॉफ्टवेअरच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्हा परिषद स्वतंत्ररित्या नव्याने सॉफ्टवेअर तयार करत असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून समजली.

१५ ऑगस्टपर्यंत सोलर
जिल्ह्यातीलशाळा संगणकीकृत करण्यात आल्या आहेत. टप्प्याटप्प्याने हजार १०० शाळांना सॉफ्टवेअर देण्यात आले. त्यासाठी जि. प. तंत्रशिक्षक प्रयत्नशील आहेत. ७५ ठिकाणी सौर यंत्रणा बसवण्याची मुदत संपली आहे. त्यामुळे संबंधित ठेकेदाराला तातडीने काम पूर्ण करण्याची तंबी दिली आहे. १५ ऑगस्टपर्यंत काम पूर्ण होईल.'' अशोककडूस, जिल्हाशिक्षणाधिकारी.