नगर - हिंदूधर्मियांना मुस्लिमांची भीती, तर मुस्लिमांमध्ये हिंदूविषयी भीती निर्माण करुन समाजात संशयाचे वातावरण निर्माण करण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे. धर्मांधतेच्या विरोधात आवाज उठवल्यानेच कॉम्रेड गोविंद पानसरे, एम. एम. कलबर्गी डॉ. नरेंद्र दाभोलकर या विवेकवाद्यांचा सनातनी धर्मांध शक्तींकडून खून झाला. धर्म मराठी माणूस संकटात असल्याचे भासवून भावनिक मुद्दयांचे राजकारण करत समाजात फूट पाडण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू आहे, असा आरोप भाकपचे राज्य सचिव कॉम्रेड डॉ. भालचंद्र कांगो यांनी भाजपवर केला.
कोल्हार ते कोल्हापूर या जन्मभूमी ते कर्मभूमीपर्यंत काढण्यात आलेल्या कॉम्रेड पानसरे समता संघर्ष यात्रेचे श्रमिकनगर येथे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. याप्रसंगी भाकप राज्य महिला फेडरेशनच्या कॉम्रेड स्मिता पानसरे, शहर सचिव कॉम्रेड शंकर न्यालपेल्ली, अॅड. सुधीर टोकेकर, रावसाहेब म्याना, अॅड. सुभाष लांडे, शांताराम वाळुंज, महेबूब सय्यद, बहिरनाथ वाकळे, सुभाष कडलग, अॅड. संभाजी बोरुडे, अभय टाकसाळ, कारभारी उगले, बन्सी सातपुते, वली कादरी सय्यद, मुकुंद सोनटक्के, अब्दुल रहेमान शेख, शिवाजी जिंदम, नानासाहेब कदम, संतोष खोडदे, कमलेश सप्रा, संदीप अल्हाट, शंकर येमूल, अंबादास चिट्ट्याल, शिवराम श्रीगादी, सुरेश बोज्जा आदींसह ऑल इंडिया स्टुडंटस फेडरेशन अखिल भारतीय नौजवान सभेचे युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कॉम्रेड डॉ. कांगो म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक धर्माचा आदर केला. पानसरेंनी "शिवाजी कोण होता?' या पुस्तकाच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेसमोर आणला. सामान्य जनता महागाईने होरपळत असताना महागाईपेक्षा धार्मिक बाबींना अधिक महत्त्व देऊन दोन समाजात संशयाचे वातावरण निर्माण करण्याचे काम सुरू आहे. कामगारविरोधी सरकार सत्तेवर आल्याने कामगारांचे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेl. कामगारविरोधी धर्मांध सत्ताधाऱ्यांच्या विरोधात संघटित होण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी, तसेच पानसरे, कलबर्गी डॉ. दाभोलकर यांचे विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी या संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आल्याचे ते म्हणाले.
पारनेर, राळेगणसिध्दी, शिरुर, चौफुला, लोणंद, सातारा येथून मार्गक्रमण करत २४ नोव्हेंबरला ही संघर्ष यात्रा कोल्हापुरात पोहचणार असून त्याच ठिकाणी यात्रेचा समारोप होणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
वर्गविरहित परिवर्तनासाठी संघर्ष
समाजात "गो-हत्या पाप, तर दलित हत्या माफ' असे प्रकार घडत आहेत. समाजात द्वेष पसरवण्याचे काम करणाऱ्या धर्मांध शक्तींच्या विरोधात संघर्ष यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. समाजात वर्गविरहित परिवर्तन घडवण्यासाठी हा संघर्ष असल्याचे गोविंद पानसरे यांची कन्या स्मिता पानसरे यांनी यावेळी स्पष्ट केले.