आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सेना-भाजपचं जुळलं; पण आघाडीत बिनसलं

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- आमदार संग्राम जगताप यांनी महापौरपदाचा राजीनामा दिल्यानंतर महापालिकेत राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादीबरोबर पुन्हा आघाडी करायची की नाही, याबाबत पक्षपातळीवर निर्णय होणार असल्याचे काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी स्पष्ट केले आहे. राष्ट्रवादीने १४ महिन्यांच्या कार्यकाळात एकवेळाही विश्वासात घेतले नाही, महापौरपदाचा राजीनामा देण्याबाबतही त्यांनी विचारले नसल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. दरम्यान, आघाडीत बिघाडी झाली असली, शिवासेना- भाजपचे मात्र सूत जुळले आहे. युतीचा महापौरपदाचा उमेदवार म्हणून सचिन जाधव यांचे नाव गुरुवारी निश्चित झाले.

महापालिका निवडणुकीत ११ जागेवर विजय मिळवत राष्ट्रवादीबरोबर आघाडी करून सत्तेत सहभागी झालेला काँग्रेस पक्ष आता पुन्हा राष्ट्रवादीबरोबर जाऊ इच्छित नाही. मनपात सत्ताधारी पक्षातील दोन नंबरचा पक्ष म्हणून काँग्रेसला उपमहापौरपद मिळाले. जगताप यांनी महापौरपदाचा राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दिव्य मराठीशी बोलताना चव्हाण म्हणाले, राष्ट्रवादीने महापौरपदाच्या १४ महिन्यांच्या कार्यकाळात काँग्रेसला अपमानास्पद वागणूक दिली. काँग्रेसपेक्षा त्यांना मनसे अपक्ष नगरसेवक जास्त प्रिय आहेत. काँग्रेसला एकदाही विश्वासात घेतले नाही.
कोणत्याही विकास कामांच्या उद्घाटनाच्या जाहिरातींमध्ये मनसे नगरसेवकांचे फोटो लावले, परंतु सत्तेत सहभागी असलेल्या काँग्रेसच्या शहर जिल्हाध्यक्षांचा फोटो लावावा, असे त्यांना एकदाही वाटले नाही. केवळ उपमहापौरांचा फोटो लावला म्हणजे पक्षाचा फोटो लावणे नव्हे. राष्ट्रवादीच्या या भूमिकेमुळे काँग्रेसच्या प्रतिमेला धक्का बसला आहे. महापौरपदाचा राजीनामा देण्याबाबत आठ दिवसांपूर्वी निर्णय घेण्यात आला. काँग्रेसला मात्र या निर्णयाबाबत अंधारात ठेवण्यात आले. राजीनामा देण्याबाबत आम्हाला विश्वासात घेतले नाही, तर आम्ही पुन्हा आघाडी कशी करायची, असा प्रश्न चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसचे प्रदेश सचिव गणेश पाटील यांना तसे पत्रही पाठवले असल्याचे त्यांनी सांगितले.
आघाडी करायची की नाही, याबाबत पक्षपातळीवर निर्णय होईल. त्यासाठी लवकरच पक्ष निरीक्षकांची नेमणूक होणार असल्याचेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. चव्हाण यांच्या या भूमिकेमुळे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते अस्वस्थ झाले आहेत. युतीने मात्र महापौरपदासाठी एकजुटीने लढण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांमध्ये गुरूवारी बैठक झाली, त्यात महापौरपदाचे उमेदवार म्हणून सचिन जाधव यांचे नाव निश्चित झाले. त्यामुळे युतीचं जुळलं, मात्र आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र आहे. आघाडीतील बिघाडी कायम राहिली, तर महापालिकेत राजकीय उलथापालथ होणार हे निश्चित आहे.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, राष्ट्रवादीची डोकेदुखी...
बातम्या आणखी आहेत...