आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी; राष्ट्रवादीला लागेना काँग्रेसच्या प्रतोदचा शोध

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जिल्हा परिषदेच्या कारभारावरून काँग्रेसच्या सदस्यांनी अध्यक्षांच्या दालनाला टाळे ठोकण्याचा इशारा दिल्यानंतर वातावरण तापू लागले आहे. काँग्रेसचा पक्षप्रतोद कोण हे अजूनही समजले नाही, कुणीही पत्रकार परिषद घेतंय, असा टोला राष्ट्रवादीचे पक्षप्रतोद शरद नवले व पदाधिकार्‍यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन मारला.

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने युतीला हाताशी धरून काँग्रेसला धोबीपछाड दिला होता. काँग्रेसचे सदस्य अण्णासाहेब शेलार यांनी बाळासाहेब हराळ यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषदेच्या कारभाराविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आठवडाभरात कारभार सुधारला नाही, तर अध्यक्ष विठ्ठल लंघे यांच्या दालनाला टाळे ठोकण्याचा इशारा त्यांना दिला. काँग्रेसकडून झालेले आरोप सत्ताधार्‍यांच्या जिव्हारी लागले आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने पत्रकार परिषदेत काँग्रेसचा खरपूस समाचार घेतला. नवले म्हणाले, जिल्हा परिषदेत समन्वयाने काम सुरू आहे. दालनाला टाळे ठोकून कामे होत नाहीत, तर दारे उघडून कामे होतात. अध्यक्षांवर केलेले आरोप राजकीय भावनेतून केले गेले आहेत. लंघे यांनी दुष्काळात चांगले काम केले. जिल्हा परिषदेत प्रथमच जास्त निधी आणला. सदस्यांची कामे करताना पक्ष पाहिला जात नाही. काँग्रेसबरोबर समन्वय ठेवण्याची आमची भूमिका आहे, पण त्यांचा पक्षप्रतोद कोण आहे, हे अद्यापि आम्हाला समजलेले नाही. कोणीही पत्रकार परिषद घेतो. त्यामुळे कुणाशी चर्चा करावी हे कळत नाही. काँग्रेसच्या नवीन सदस्यांकडून सहकार्य मिळते, पण ठरावीक सदस्यांकडून राजकारणातून आरोप केले जातात.

हराळांनी किती सेस दिला?
बाळासाहेब हराळ पदाधिकारी असताना त्यांनी किती सदस्यांना सेसचा निधी दिला हे सांगावे. त्यांनी जाता-जाता 36 लाखांचा निधी स्वत:च्या गटात नेला. काँग्रेसच्या ज्येष्ठ सदस्यांकडून सातत्याने आरोप केले जात आहेत, अशी टीका सदस्य सुनील गडाख यांनी केली.

निधी दिला नाही म्हणून आरोप
शेलार यांनी बंधारे दुरुस्तीसाठी 9 लाख 90 हजारांचा निधी मागितला. वास्तविक या रकमेतून नवीन बंधारा करता येईल. त्यामुळे असा निधी मंजूर केला नाही. त्यामुळे दुखावले जाऊन आरोप केले जात आहेत, असा टोला सभापती हर्षदा काकडे यांनी काँग्रेस सदस्यांना लगावला.