आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस व राष्ट्रवादीमध्ये शहरात होणार बिघाडी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - विधानसभा निवडणुकीचा बिगुल कधीही वाजण्याची शक्यता असताना नगर शहर विधानसभा मतदारसंघासाठी आघाडीतील बिघाडी प्रकर्षाने समोर येत आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीतील दोन्ही प्रमुख पक्षांनी शड्डू ठोकत या जागेवर दावा केला आहे. ही जागा काँग्रेसकडेच असल्याचा छातीठाेक दावा करणारे स्थानिक नेते आता उमेदवारीच्या स्पर्धेबाहेर पडल्याचे चित्र आहे. काँग्रेसकडून युवकचे उपाध्यक्ष सत्यजीत तांबे व राष्ट्रवादीकडून महापौर संग्राम जगताप यांनी वातावरण निर्मितीस सुरुवात केली अाहे. त्यामुळे आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता असून ती शिवसेनेचे आमदार अनिल राठोड यांच्या पथ्यावर पडण्याची शक्यता अाहे.
नगरची जागा गेल्या दोन निवडणुकांमध्ये काँग्रेस व राष्ट्रवादीने आलटून-पालटून लढवली. गेल्या पाच निवडणुकांमध्ये वाढत्या मताधिक्याने विजय मिळवत आमदार राठोड यांनी मतदारसंघावर निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले अाहे. डबल हॅटट्रिकची तयारी करूनच ते मैदानात उतरणार असल्याचे गेल्या पंधरा दिवसांतील त्यांच्या विविध आंदोलनांतून स्पष्ट झाले आहे. महापालिकेची सत्ता सध्या आघाडीच्या ताब्यात आहे. याचा पुरेपूर फायदा घेत नागरी प्रश्नांवर आक्रमक आंदोलने करीत त्यांनी नागरिकांच्या अधिकाधिक जवळ जाण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
गेल्यावेळी ही जागा काँग्रेसने लढवली होती. त्यामुळे यावेळीही शहराची जागा काँग्रेसच लढवणार असल्याचा दावा करत उमेदवारी पदरात पाडून घेण्याचा आटाेकाट प्रयत्न काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून गेल्या एक महिन्यापासून सुरू आहे. या जागेसाठी इच्छुक असलेल्या सत्यजीत तांबे यांना स्पर्धेतून बाद करण्यासाठी बाहेरचा उमेदवार लादू नका; अन्यथा वेगळा विचार करू, असा इशारा देणारा ठरावही शहर जिल्हा काँग्रेसच्या पदािधकाऱ्यांनी प्रदेश समितीकडे पाठवला. मात्र, इच्छुक म्हणून पक्षाकडे अर्जही न करणारे तांबे यांचा शहरातील वावर सध्या वाढला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या निधीतून झालेल्या कामाचे उद््घाटन असो किंवा विविध कारणांनी नगरकरांपर्यंत पाेहोचण्याचा तांबे यांचा प्रयत्न त्यांच्या उमेदवारीचे संकेत देत आहेत. त्यांच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावत स्थानिक पदाधिकाऱ्यांनी बाहेरचा उमेदवार चालू शकतो, असेच संकेत दिले आहेत.राष्ट्रवादीकडून मुंबईत इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या. महापौर जगताप यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. राष्ट्रवादीच्या पदरात यावर्षी काही वाढीव जागा पडणार आहेत. त्यात नगरमध्ये पक्षाची ताकद वाढल्याचे, तसेच महापौरपद पक्षाकडे असल्याचे कारण पुढे करत ही जागा राष्ट्रवादीकडे खेचण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर्वांच्या इच्छेनुसार उमेदवारी मिळाल्यास निवडणूक लढवणार असल्याचे जगताप यांनी यापूर्वीच "दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले आहे. त्यांना पक्षातूनच विरोध होत असून युवकचे पदाधिकारी किरण काळे यांना पुढे करून पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी जगताप यांच्या उमेदवारीत खोडा घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
राष्ट्रवादीत उमेदवारीवरून वैयक्तिक
आरोप-प्रत्यारोपही झाले. सध्या हा वाद शांत असला, तरी ऐनवेळी हा वाद उदभवण्याची शक्यता आहे.
फायदा शिवसेनेलाच...
जागा काँग्रेस, राष्ट्रवादी यापैकी कोणाकडेही गेली, तरी साठमारीचा परिणाम निकालावर होणार आहे. अंतर्गत विरोधक व मित्रपक्षातील दुखावलेले शिवसेनेच्या मदतीला धावतील. त्यामुळे फायदा आमदार राठोड यांना मिळण्याची शक्यता आहे.