नगर- जाहीर प्रचारासाठी थोडा कालावधी उरलेला असतानाही काँग्रेसचा एकही बडा नेता प्रचारासाठी जिल्ह्यात फिरकलेला नाही. ऐन रणधुमाळीत "अरे, कुठे गेले नेते आमचे?,' असा सवाल काँग्रेसच्या उमेदवारांकडून उपस्थित केला जात आहे.
आघाडीत फाटाफूट झाल्यानंतर काँग्रेसने जिल्ह्यातील बाराही मतदारसंघांत
आपले उमेदवार दिले. मात्र, प्रचाराच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेसचा एकही दिग्गज नेता जिल्ह्यात प्रचारासाठी आलेला नाही. आता प्रचार हातघाईवर आला असतानाही नेते फिरकायला तयार नाहीत. पक्षाच्या अशा धोरणामुळे पारनेरमधील पक्षाचे उमेदवार शिवाजी जाधव यांनी निवडणूक रिंगणातून पळ काढला. जिल्ह्यातील काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराची सर्व मदार माजी मंत्री बाळासाहेब थोरात व राधाकृष्ण विखे यांच्यावर आहे. मात्र, हे दोन्ही मंत्री आपापल्या मतदारसंघातच अडकून पडले आहेत. त्यामुळे इतर उमेदवारांच्या प्रचारासाठी त्यांच्याकडून कमी वेळ मिळत आहे. नगर शहरात थोरात यांचे भाचे सत्यजित तांबे रिंगणात असतानाही बाळासाहेब थोरात यांना त्यांच्या प्रचारासाठी पुरेसा वेळ देता आलेला नाही.
काँग्रेसध्यक्ष
सोनिया गांधी, उपाध्यक्ष राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रचारप्रमुख नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे या प्रमुखांपैकी एकाही नेत्याची प्रचारसभा जिल्ह्यात आतापर्यंत झालेली नाही. त्यामुळे मंत्री थोरात व विखे वगळता इतर उमेदवारांकडून "अरे... कुठे नेऊन ठेवले नेते आमचे' असा उद्विग्न सवाल उपस्थित करण्यात येत आहे.