आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसने सध्याच्या मानसिकतेतून बाहेर येण्याची गरज : विखे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जिल्हा काँग्रेस पक्षाच्या जिल्हा मेळाव्यात मार्गदर्शन करताना विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे. )
नगर- काँग्रेस गेली पंधरा वर्षे केंद्र राज्यात सत्तेवर होती. त्यामुळे सत्तेच्या विरोधात बोलण्याची कार्यकर्त्यांसह नेत्यांवर वेळ आली नव्हती. या मानसिकतेतून पक्षाच्या नेते कार्यकर्त्यांनी बाहेर येण्याची आवश्यकता आहे, असे मत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी गुरुवारी व्यक्त केले.

जिल्हा काँग्रेस कार्यालयात आयोजित मेळाव्यात विखे बोलत होते. जिल्हा बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांचा यावेळी सत्कार करण्यात आला. जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे, ज्येष्ठ नेते शिवाजीराव नागवडे, आमदार डॉ. सुधीर तांबे यावेळी उपस्थित होते. विखे म्हणाले, जिथे पक्षाकडे सत्ता आहे, तिथूनच पक्षाला बळकटी देण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. पक्षाचे पदाधिकारी घरीच बसलेले असतात. या पदाधिकानी पुढाकार घेऊन कार्यकर्त्यांना बळ देणे गरजेचे आहे. सद्यस्थितीतून पक्षाचे नेते कार्यकर्त्यांनी बाहेर येऊन पक्षाला उभारी देण्याची आवश्यकता आहे.

केंद्र राज्य सरकारमधील मंत्र्यांना कायमस्वरूपी योगा करण्यासाठी घरी पाठवण्याची वेळ आली आहे, असा टोला मारून विखे म्हणाले, शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची पदवी बनावट आढळून आली. कायद्याने सांगूनही ते स्वत: पदावरून बाजूला झाले नाहीत. त्यांनी स्वत:हून पायउतार होणे आवश्यक होते. हे सरकार निर्ढावलेले आहे. महिला बालकल्याण विभागाच्या घोटाळ्यात या सरकारमधील मंत्र्यांनी लहान मुलांचाही वार केला नाही. हे ठेकेदार बिल्डरांचे सरकार आहे. विषारी दारूप्रकरणी बळी गेलेल्यांच्या कुटुंबीयांकडे एकही मंत्री सांत्वनासाठी गेला नाही. मुख्यमंत्र्यांनाही वेळ मिळालेला नाही. मुख्यमंत्री एवढे बेफिकीर असतील, तर अधिकारी काय करणार?

केंद्र राज्य सरकारचे अपयश लपवण्यासाठी सरकार सामान्य जनतेचे लक्ष इतरत्र वळवत आहे. शेतकच्या आत्महत्यांबाबत सरकार गंभीर नसल्याने आत्महत्या रोखण्याच्या कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाहीत. २७ जूनपासून संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी अमरावतीपासून आंदोलनाला सुरुवात करण्यात येणार आहे. नगर इतर जिल्ह्यांपेक्षा अधिक या आंदोलनात सक्रिय राहील, असे विखे म्हणाले.

जिल्हाध्यक्ष ससाणे म्हणाले, अनेक वर्षे सत्तेत असल्याने कार्यकर्ते नेत्यांना आंदोलन सरकारच्या विरोधात बोलण्याची सवय उरलेली नाही. कार्यकर्त्यांना अजून सत्तेत असल्यासारखेच वाटत आहे.

चिक्की घोटाळ्या विरोधात आंदोलन करा
नगरसह २० जिल्ह्यांना २० कोटी ९९ लाखांची चिक्कीची ऑर्डर देण्यात आली होती. निकृष्ट चिक्कीच्या विरोधात नगर जिल्ह्याने पहिल्यांदा आवाज उठवला. अन्न औषध प्रशासनाच्या आयुक्तांनी मात्र कारवाईऐवजी चिक्की बदलून देण्याची बोटचेपी भूमिका घेतली. मुंबईच्या अन्न तपासणी केंद्राने चिक्कीचे नमुने स्वीकारले नाहीत.हा घोटाळा सर्वानुमते सुरू आहे. तो उघडकीस आणण्यासाठी आंदोलन करायला हवे, जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब हराळ यांनी बैठकीत सांगितले.
बातम्या आणखी आहेत...