आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Councilors Demand For The Post Of Mayor

पुढील अडीच वर्षे महापौरपद द्या, तरच पाठिंबा, काँग्रेस नगरसेवकांची मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- महापौर निवडणूक अवघी एका दिवसांवर येऊन ठेपली असताना काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये अजूनही धुसफूस सुरू आहे. पुढील अडीच वर्षे महापौरपदाचा शब्द द्या, तरच पाठिंबा देऊ, अशी गळ काँग्रेस पदाधिकारी काही नगरसेवकांनी दोन्ही पक्षांच्या पक्षनिरीक्षकांच्या बैठकीत शनिवारी घातली. दरम्यान, आघाडीबाबतचा निर्णय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण घेणार असल्याचेही या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. चव्हाण यांनी रात्री उशिरापर्यंत निर्णय दिल्याने राष्ट्रवादीची चिंता वाढली आहे.
महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पक्षनिरीक्षक शरद रणपिसे राष्ट्रवादीचे पक्षनिरीक्षक अंकुश काकडे यांनी काँग्रेस पक्षकार्यालयात शनिवारी बैठक घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दादा कळमकर, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण, युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सत्यजित तांबे, विनायक देशमुख, उपमहापौर सुवर्णा कोतकर, नगरसेविका सविता कराळे, सुनीता कांबळे, बाळासाहेब पवार आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादीकडून सन्मानाची वागणूक मिळत नाही, त्यामुळे पुन्हा आघाडी करायची की नाही, याबाबत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी तक्रार काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी यापूर्वीच वरिष्ठांकडे केली होती. त्यामुळे राष्ट्रवादीची चिंता वाढली होती. काँग्रेस आमच्याबरोबर असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला. परंतु त्यांचा हा दावा फोल ठरला.
पुढील अडीच वर्षे महापौरपद काँग्रेसला देण्याचा शब्द द्या, तरच पाठिंबा देऊ, असे काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे पक्षनिरीक्षक काकडे यांना सांगितले. काँग्रेसचे पक्षनिरीक्षक रणपिसे यांनीही राष्ट्रवादीबरोबर जायचे की बाहेर पडायचे, याबाबतचा निर्णय प्रदेशाध्यक्ष चव्हाण घेणार असल्याचे बैठकीत स्पष्ट केले. त्यामुळे आघाडीत एेनवेळी बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसचे केडगावमधील एक नगरसेवक शिवसेनेबरोबर सहलीला गेले आहेत. याबाबतही बैठकीत चर्चा झाली. हा नगरसेवक शिवसेनेबरोबर गेलाच कसा? असा जाब रणपिसे यांनी काँग्रेस पदाधिकाऱ्यांना विचारला. काँग्रेसने महापौरपदाची मागणी केली असली, तरी राष्ट्रवादीने अद्याप त्यांना तसा शब्द दिलेला नाही. त्यामुळे काँग्रेसने ऐनवेळी भूमिका बदली, तर राष्ट्रवादीसमाेर पेच निर्माण होईल.
गटनेत्याने बजावला व्हीप
राष्ट्रवादीपाठोपाठ काँग्रेसचे गटनेते संदीप कोतकर यांनी शनिवारी आपल्या नगरसेवकांना व्हीप बजावला. नॅशनॅलिस्ट पार्टी अपक्ष नगरसेवक यांची शहर विकास आघाडीचे उमेदवार अभिषेक कळमकर यांनाच मतदान करावे, असे या व्हीपमध्ये म्हटले आहे. आघाडीचा निर्णय झालेला नाही. मात्र, गटनेत्याने कळमकरांना मतदान करण्याचा व्हीप बजावल्याने काँग्रेससह सर्वच पक्षांमध्ये गांेधळ निर्माण झाला आहे.
अद्याप निर्णय नाही
- काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी नगरसेवकांशी महापौरपदाच्या निवडणुकीबाबत चर्चा केली. राष्ट्रवादीबरोबर जायचे की नाही, याबाबत प्रदेशाध्यक्ष चव्हाण निर्णय घेणार आहेत. त्यांना सर्व परिस्थिती सांगितली आहे. त्यांनी अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही. परंतु रात्री उशिरापर्यंत ते आपला निर्णय कळवतील.''
शरदरण पिसे, पक्षनिरीक्षक, काँग्रेस.