आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Congress Fighting Its Own Water Congress District Chairman Jayant Sasane

हक्काच्या पाण्यासाठी काँग्रेस संघर्ष करणार - काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर - कुकडी, तसेच पिंपळगाव जोगे धरणातील नगर जिल्ह्याच्या हक्काच्या पाण्यासाठी काँग्रेस पक्ष संघर्ष करणार असून या संदर्भात लवकरच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत बैठक आयोजित करण्यात येणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांनी दिली.

पारनेर येथे बूथ कमेटीच्या मेळाव्यानंतर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल झावरे यांनी ससाणे यांच्याकडे कुकडी व पिंपळगाव जोगे धरणातील पाण्याबाबत पारनेरकरांवर होत असलेल्या अन्यायाबाबत व्यथा मांडली. त्यावेळी बोलताना ससाणे म्हणाले, कुकडी तसेच पिंपळगाव जोगे धरणातून सोडण्यात येणार्‍या आवर्तनाबाबत नगर जिल्ह्याला नेहमीच संघर्ष करावा लागतो. पुणे जिल्ह्यातील नेते हे पाणी स्वत:च्या जिल्ह्याला जास्तीत जास्त कसे मिळेल, याची काळजी घेत असल्याने कालवे असूनही नगर जिल्ह्यास मात्र नेहमीच सापत्नपणाची वागणूक मिळते. माजी खासदार बाळासाहेब विखे, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, तसेच माजी आमदार नंदकुमार झावरे यांनी वेळोवेळी या प्रश्नावर आवाज उठवला आहे.

विखे यांनी तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नेहमीच लक्ष्य करून तालुक्याच्या हक्कासाठी लढा दिला आहे. काँग्रेसमधील एक गट या पाण्यासाठी संघर्ष करीत असताना पक्षातील इतर गटांकडून मात्र अपेक्षित साथ मिळत नसल्याने हा प्रश्न प्रलंबित पडत आहे. झावरे म्हणाले, पारनेर तालुक्यावर निसर्गानेही अन्याय केला असून पाण्याच्या रूपाने मानवनिर्मितही अन्याय होत आहे. पुणे जिल्ह्यातील पुढारी तालुक्याला पाणी मिळू देत नाहीत. त्यासाठी सातत्याने संघर्ष करावा लागतो. पुण्याच्या मंडळींनी पाण्यावर मालकी निर्माण केली असून विकास, सत्ता, तसेच पाण्याच्या बाबतीतही सतत अन्याय होत असल्याने या प्रश्नात लक्ष घालण्याची मागणी झावरे यांनी केली. ससाणे म्हणाले, पिंपळगाव जोगे व कुकडीच्या आवर्तनाबाबत होणार्‍या अन्यायाबाबत काँग्रेस पक्ष वेळ पडली, तर रस्त्यावर उतरेल, असा इशारा त्यांनी दिला.दरम्यान, कुकडी व पिंपळगाव जोगे धरणातील आवर्तनाबाबत काँग्रेस संघर्ष करत असल्याचे ससाणे यांनी सांगून काँग्रेसमधील एक गट त्यास अपेक्षित साथ देत नसल्याचे स्पष्ट केल्याने काँग्रेसमध्ये पाणी देण्याबाबत मतभेद असल्याचे उघड झाले आहे. यावेळी काँग्रेसचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.


पालकमंत्री पाचपुते यांनी अन्याय केला
ससाणे म्हणाले, नगरला पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम पुणे जिल्ह्यातील नेतृत्वाने केले आहे. काँग्रेस या अन्यायाविरोधात आंदोलन करणार आहे. जिल्हास्तरावरील विविध समित्या नेमताना पालकमंत्री बबनराव पाचपुते यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. संजय गांधी निराधार योजनेची समिती काँग्रेसच्या वाट्याला आलेली असताना पाचपुते यांनी पारनेरमध्ये परस्पर नियुक्ती केल्याने कार्यकर्त्यांत असंतोष आहे. त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करण्यात येणार असल्याचे ससाणे यांनी सांगितले.