आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस तालुकाध्यक्षाचा पोलिस पथकावर हल्ला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदा - खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेला काँग्रेसचा तालुकाध्यक्ष दीपक भोसले यास अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिस निरीक्षक अजय जाधवराव व त्यांच्या पथकावर गुरुवारी हल्ला झाला. दुपारी साडेचारच्यादरम्यान भोसलेला काष्टीत त्याच्या राहत्या घराजवळ पाठलाग करून पकडण्यात आले. त्यावेळी मोठी झटापट झाली. पोलिसांनी त्याच्याकडून रिव्हॉल्वर व 5 राऊंड हस्तगत केले. मात्र, त्याचवेळी 30-35 जणांच्या महिला व पुरुषांच्या जमावाने पोलिसांबरोबर झटापट के ल्याने भोसले पसार झाला.
काष्टीत काळे व राहिंज कुटुंबातील चौघांना बेदम मारहाण केल्याप्रकरणी भोसले याच्यासह 21 जणांविरूद्ध सुमारे दीड महिन्यापूर्वी खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. मात्र, तेव्हापासून भोसले व इतर आरोपी फरारी होते. यापूर्वीही भोसले पोलिसांच्या हातून
निसटला होता.
अधीक्षक कार्यालयातून गुरुवारी आलेल्या माहितीनुसार दुपारी साडेचारच्या सुमारास निरीक्षक जाधवराव, उपनिरीक्षक दीपक बर्डे, कर्मचारी पारधी व बढे हे काष्टी-वांगदरी रस्त्यावरील भोसलेच्या शेतातील घरी पोहोचले. पोलिसांना पाहताच त्याने घराच्या पाठीमागे असलेल्या संरक्षक भिंतीवरून उडी मारून जवळच असणा-या उसाच्या शेतात पळण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले, पण त्याच्याकडे रिव्हॉल्व्हर असल्याचे लक्षात येताच पोलिस थबकले. प्रसंगावधान दाखवत जाधवराव यांनी त्याच्याकडील रिव्हॉल्व्हर शिताफीने काढून घेतले. यावेळी पोलिसांबरोबर भोसलेची चांगलीच झटापट झाली. त्यात तो जखमी झाला.
यादरम्यान त्याच्या घरातील लोकांनी दूरध्वनी करून परिसरातील लोकांना बोलावले. 30- 35 जणांच्या जमावाने भोसलेला घेऊन जाणा-या पोलिसांना अडवले. महिलांनी पोलिसांना मिठ्या मारल्या, तर काहीजण गाडीपुढे आडवे झाले. त्यामुळे मोठा गोंधळ झाला. जमावाच्या तुलनेत पोलिस चारच असल्याने त्याचा फायदा घेत भोसले वांगदरीच्या दिशेने पसार झाला. पाठलाग करण्याचा प्रयत्न करणा-या पोलिसांना जमावाने अडवल्याने त्यांचाही नाईलाज झाला. याप्रकरणी उशिरापर्यंत कोणावरही गुन्हा दाखल झालेला नव्हता.
जमावाविरुद्ध गुन्हा दाखल करणार - जमावात वृद्ध महिला व पुरुष असल्याने आमचा नाईलाज झाला. भोसलेला पकडल्यानंतर तो गयावया करीत असतानाच जमावातील महिलांनी पोलिसांचे पाय धरल्याने अडचणी वाढल्या. आरोपीकडील रिव्हॉल्व्हर व पाच राऊंड जप्त क रण्यात मात्र यश मिळाले. भोसले व जमावाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. - अजय जाधवराव, पोलिस निरीक्षक.