आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अध्यक्षांच्या दालनाला टाळे ठोकणार का ?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जिल्हा परिषदेत अध्यक्ष, उपाध्यक्षांचा अधिकार्‍यांवर वचक राहिलेला नसल्याचा आरोप करून काँग्रेसचे सदस्य अण्णासाहेब शेलार यांनी अध्यक्ष विठ्ठल लंघे यांच्या दालनाला टाळे ठोकण्याचा इशारा दिला होता. राष्ट्रवादीनेही काँग्रेसला चोख प्रत्युत्तर दिले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेतील वातावरण चांगलेच तापले असून मंगळवारी (3 सप्टेंबर) अध्यक्षांच्या दालनाला टाळे ठोकले जाण्याची शक्यता आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता, पशुसंवर्धन अधिकारी मंगळवारी कार्यालयात उपस्थित नसतात. अध्यक्ष, उपाध्यक्षांचा वचक नसल्याने प्रशासन बिनकामाचे झाले आहे. आठवडाभरात कामकाजात सुधारणा न झाल्यास अध्यक्षांच्या दालनाला टाळे ठोकण्याचा इशारा शेलार यांनी आठवडाभरापूर्वी दिला होता. यावेळी सदस्य बाळासाहेब हराळ उपस्थित होते. काँग्रेसच्या सदस्यांकडून दिलेला इशारा राष्ट्रवादीला चांगलाच जिव्हारी लागला.

नंतर युती व राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर टीका केली. काँग्रेसशी समन्वय ठेवायला आमची दारे उघडी आहेत, पण त्यांचा पक्षप्रतोद कोण हेच समजत नाही, कोणीही पत्रकार परिषद घेत आहे, अशी टीका गटनेते शरद नवले यांनी केली. आरोप-प्रत्यारोपांमुळे वातावरण चांगलेच तापले. शेलार यांनी दिलेल्या इशार्‍यानुसार मंगळवारी अध्यक्षांच्या दालनाला टाळे ठोकून आंदोलन होण्याची शक्यता आहे. पण काँग्रेसच्याच काही सदस्यांनी ‘‘याबाबत शेलार यांनाच विचारा’’ असे म्हणत माघार घेतली. त्यामुळे टाळे ठोकण्याचे आंदोलन होणार का, याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.