आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जनहितविरोधी धोरणांचा निषेध; जिल्हा काँग्रेसचा रास्ता रोको

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- केंद्र व राज्य शासनाच्या जनहित विरोधी धोरणाचा निषेध करत जिल्हा काँग्रेसने मंगळवारी मार्केट यार्ड चौकात रास्ता रोको आंदोलन केले. जिल्हाध्यक्ष जयंत ससाणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनाने नगर-पुणे रस्त्यावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
ससाणे यांच्या नेतृत्वाखाली दुपारी दीडच्या सुमारास आंदोलनाला सुरुवात झाली. सर्वच वक्त्यांनी केंद्र व राज्य सरकार जनहिताच्या विरोधात निर्णय घेत असल्याचा आरोप केला. शेतकरी नैसर्गिक संकटांनी मेटाकुटीला आला असताना सरकारने त्यांना वाऱ्यावर सोडले. पॅकेजच्या नावाखाली तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. निवडणूकपूर्व आश्वासनांचा विसर पडलेल्या सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आराेप करण्यात आला. आंतरराष्ट्रीय बाजापेठेत इंधनाचे दर प्रचंड घसरले असून या दरानुसार पेट्रोल ३५ व डिझेल २३ रुपये प्रतिलिटर करणे आवश्यक होते. मात्र, नाममात्र कपात करून जनतेची लूट सुरू आहे. उद्योगपतींच्या हिताचे निर्णय घेत भूमी अधिग्रहण कायदा आणला. गोरगरिबांसाठीच्या योजनांना कात्री लावण्यात येत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. मुस्लिम समाजाला आरक्षण लागू करण्याची मागणीही आंदोलकांनी केली. पोलिस उपअधीक्षक वाय. डी. पाटील यांना निवेदन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आमदार भाऊसाहेब कांबळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अण्णा शेलार, पक्ष निरीक्षक अश्विनी बोरस्ते, उपमहापौर सुवर्णा कोतकर, पदाधिकारी दीप चव्हाण, विनायक देशमुख, बाळासाहेब हराळ आदी यावेळी उपस्थित होते.
माजी मंत्र्यांची आंदोलनाकडे पाठ-
युती सरकार सत्तेत आल्यानंतर विरोधी पक्षनेते असलेल्या राधाकृष्ण विखे यांच्या जिल्ह्यात पहिल्यांदाच सरकारविरोधात आंदोलन छेडण्यात आले. त्यामुळे या आंदोलनाकडे लक्ष लागले होते व मोठे आंदोलन अपेक्षित होते. मात्र, माजी मंत्री विखे व बाळासाहेब थोरात यांनी या आंदोलनाकडे पाठ फिरवली. त्यांच्याप्रमाणेच कार्यकर्तेही आंदोलनाकडे फिरकले नसल्याने आंदोलकांची संख्या विरळ होती. नगरकरांच्या दृष्टीने आंदोलन अदखलपात्र ठरले.