आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बांधकामाचे कम्प्लिशन सर्टिफिकेट नसल्यास दुप्पट घरपट्टी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - महापालिका हद्दीत दर वर्षी दीड हजारापेक्षा जास्त मालमत्ता वाढत असताना प्रशासनाकडून मात्र निम्म्याच बांधकामांना परवानगी मिळते. ‘वजन’ व खेट्यांशिवाय परवानगी मिळत नसल्याने बांधकाम तसेच पूर्ण करण्याकडे नागरिकांचा कल वाढत आहे.
गेल्या चार-पाच वर्षांत नगर शहराचा विस्तार वाढला आहे. दर वर्षी दीड ते दोन हजार नवीन इमारती उभ्या राहात आहेत. नियमानुसार फी भरून बांधकाम परवानगीसाठी मनपाच्या नगररचना विभागाकडे दरवर्षी किमान दीड हजार अर्ज येतात. मात्र, या विभागाकडून नियमांची अट दाखवत नाहक त्रास दिला जातो. त्यामुळे कंटाळलेले नागरिक पुढील प्रक्रिया पूर्ण न करताच बांधकाम उरकून मोकळे होतात. त्यामुळे मनपाच्या उत्पन्नावर परिणाम होऊन अनधिकृत बांधकामांमध्ये वाढ होत आहे.
नगररचना विभागाकडे बांधकाम परवानगीसाठी या वर्षी 1 हजार 74 अर्ज आले आहेत. त्यातील केवळ 838 बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे. केवळ 40 ते 50 बांधकामांनाच कम्प्लिशन सर्टिफिकेट देण्यात आले आहे. गेल्या वर्षीही सुमारे दीड हजार लोकांनी बांधकाम परवानगीसाठी अर्ज केले होते. मात्र, त्यातील केवळ 110 लोकांनाच कम्प्लिशन सर्टिफिकेट मिळाले. दोन वर्षांपूर्वी बांधकाम परवानगीसाठी 40 रुपये चौरस मीटरप्रमाणे शुल्क आकारण्यात येत होते. मात्र, आता शासनाच्या सुधारित निर्णयानुसार शुल्क आकारण्यात येत आहे. रहिवासी बांधकाम परवानगीसाठी संबंधित जागेचे शासकीय दर गृहित धरून बांधकाम क्षेत्राच्या प्रति चौरस मीटरवर दोन टक्के, तर व्यावसायिक बांधकामासाठी चार टक्के याप्रमाणे शुल्क आकारण्यात येते. कम्प्लिशन सर्टिफिकेट तर दूरच, साधी बांधकाम परवानगीही मिळत नाही. त्याचा भुर्दंड मालमत्ताधारकांना सहन करावा लागतो. गेल्या वर्षापासून कम्प्लिशन सर्टिफिकेट नसलेल्यांकडून मनपा दुप्पट घरपट्टी आकारत असल्याने नवीन बांधकाम केलेले मालमत्ताधारक त्रासले आहेत. त्यामुळे दुप्पट घरपट्टी आकारण्याऐवजी कम्प्लिशन सर्टिफिकेट देण्याची गरज आहे.
कोणाचाच वचक नाही - परवानगीसाठी अर्ज केल्यावर नगररचना विभागाकडून बांधकाम व्यावसायिक व सर्वसामान्यांना वेठीस धरले जाते. अनावश्यक व सहजासहजी उपलब्ध न होणा-या कागदपत्रांची मागणी करून नाहक त्रास दिला जातो. पैसे देणा-यांना मात्र तत्काळ बांधकाम परवानगी दिली जाते. अभ्यासू नगरसेवक नसल्याने या प्रकाराकडे दुर्लक्ष झाले आहे. या विभागावर कोणाचाच वचक राहिलेला नाही.’’ - राजेश उपाध्ये, बांधकाम व्यावसायिक
कम्प्लिशन सर्टिफिकेट महत्त्वाचे - कम्प्लिशन सर्टिफिकेट हा बांधकाम कायदेशीर असल्याचा महत्त्वाचा पुरावा असून रजिस्ट्रेशनसाठी त्याची गरज भासते. त्याकरिता बांधकाम परवानगी घेऊन मंजूर नकाशाप्रमाणे बांधकाम करणे आवश्यक आहे. अनेकांचे बांधकाम नसल्याने कम्प्लिशन सर्टिफिकेट देण्यास अडचणी निर्माण होतात.’’ - सुरेश इथापे, अतिक्रमण विभाग प्रमुख