संगमनेर - शेतक-यांच्या प्रश्नांसाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी १५ किलोमीटर पायी प्रवास करतात. शेतक-यांचे दु:ख समजून घेत भाजपच्या धोरणांवर टीका करत आहेत आणि दुसरीकडे आमचेच नेते भाजप नेत्यांच्या हातात हात घालून आनंद साजरा करतात. काँग्रेससाठी ही दुर्दैवी गोष्ट अाहे, अशी टीका काँग्रेसचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली.
जिल्हा बँकेच्या मतदानावेळी मंगळवारी थोरात यांनी प्रदेशाध्यक्ष अशाेक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे या नेत्यांवर शरसंधान साधले. थोरात म्हणाले, ‘स्वपक्षातील नेतेच काँग्रेसच्या ध्येयधोरणांना हरताळ फासत सत्ताधा-यांशी हातमिळवणी करत आहेत. यामुळे पक्षाची प्रतिमा जनसामान्यांत मलीन होत आहे. काँग्रेस हायकमांडनेच आता या गोष्टी समजून घेऊन पक्षातील नेत्यांनी कसे वागायला हवे याबाबत सूचना द्याव्या.’ यानंतर काँग्रेसमध्ये खळबळ उडाली. बँकेच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे आणि माजी मंत्री थोरात यांच्या नेतृत्वाखालील गट एकमेकांविरोेधात लढत आहेत. विखे यांनी भाजप, शिवसेनेबरोबर हातमिळवणी केली, तर थोरात यांनी राष्ट्रवादीचे नेते मधुकर पिचड यांची सोबत घेतली आहे.
पक्षात चाललंय ते योग्य नाही
थोरात म्हणाले, बिनविरोध निवडीचा प्रस्ताव उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या काही तास आधी आला. आम्ही त्याला अनुकूलता दाखवत काही उमेदवारांचे अर्ज मागे घेतले. शेवटची पाच मिनिटे आधी हा प्रस्ताव मोडीत काढण्याचे काम विखे यांनी केले.
नांदेडात असेच हाेणार?
सहकारात पक्षीय राजकारण नसते असे सांगणा-या अशोक चव्हाण यांनी काँग्रेसजनांनी विरोधी भाजप-सेनेसोबत कोठे एकत्र यायचे, कोठे एकत्र यायचे नाही याची आचारसंहिता करावी. विखेंनी व्यक्ती सोबत न घेता पक्ष सोबत घेतला आहे. नांदेडमध्ये सहकार क्षेत्रात ते भाजप- शिवसेनेसोबत जाणार का, असा प्रश्न थोरात यांनी उपस्थित केला.