आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठेकेदारावर कारवाईचे स्थायी समितीचे आदेश

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहराच्या विविध भागात बसवण्यात आलेल्या एलईडी दिव्यांमधील गैरव्यवहार पुन्हा एकदा समोर आला आहे. सुमारे 3 कोटी 30 लाखांच्या एलईडी दिव्यांच्या एकूण कामापैकी 80 लाखांचे काम अपूर्ण असतानाही मनपा प्रशासनाने संबंधित ठेकेदाराला संपूर्ण कामाचे पैसे दिले आहेत. ठेकेदारावर उदार झालेल्या मनपा अधिकार्‍यांकडून स्थायी समितीने सविस्तर अहवाल मागवला आहे, तसेच संबंधित ठेकेदारावर कारवाईचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे ठेकेदारासह संबंधित अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहे.
महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत हाती घेतलेल्या सुमारे दहा कोटी खर्चाच्या पथदिव्यांच्या काही कामातील गैरव्यवहार वर्षभरापूर्वी उघड झाला. मनपा प्रशासनाने मात्र हा गैरव्यवहार दडपण्याची एकही संधी सोडली नाही. तत्कालिन जिल्हाधिकारी डॉ. संजीवकुमार यांनी या कामाचे त्रयस्थ संस्थेमार्फत तांत्रिक लेखापरीक्षण करण्याचे आदेश आयुक्तांना दिले. त्यानंतर 5 कोटी 19 लाखांच्या सहा कामांचे लेखापरीक्षण करण्यात आले. परंतु त्यात सुमारे 3 कोटी 30 लाखांचे एलईडी दिव्यांचे काम करणार्‍या ठेकेदाराला सोयीस्करपणे अभय देण्यात आले. लेखापरीक्षण अहवालही प्रशासनाने तब्बल सात महिने दडवून ठेवला. शुक्रवारी स्थायीच्या अंदाजपत्रकीय सभेत एलईडी दिव्यांच्या कामातील गैरव्यवहार पुन्हा एकदा समोर आला. एलईडी दिव्यांचे काम पूर्ण झाले का, असा प्रश्न सदस्यांनी सभेत उपस्थित केला असता काम अपूर्ण असल्याची कबुली संबंधित अधिकार्‍यांनी दिली. त्यामुळे संतापलेल्या सदस्यांनी ठेकेदारावर कारवाईचे आदेश दिले. स्थायीच्या सोमवारी (26 मे) होणार्‍या सभेत या कामाचा सविस्तर अहवाल सादर करण्याच्याही सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे ठेकेदारासह संबंधित अधिकार्‍यांचे धाबे दणाणले आहे.
अमित इंजिनिअर्स (औरंगाबाद) या ठेकेदार संस्थेला एलईडी दिव्यांचे काम दिले असले, तरी प्रत्यक्षात हे काम स्थानिक ठेकेदाराने केले आहे. विशेष म्हणजे मनपाचे विद्युत विभागप्रमुख बाळासाहेब साळवे यांनी याबाबत यापूर्वीच भर महासभेत कबुली दिली आहे. तरी संबंधित ठेकेदाराकडून साधा खुलासाही मागवण्यात आलेला नाही. ज्या स्थानिक ठेकेदाराने हे काम केले, तो काही अधिकारी व आजी-माजी पदाधिकार्‍यांचा लाडका ठेकेदार आहे. अपेक्षित टक्केवारी मिळत असल्याने केवळ एलईडीच नाही, तर मनपाची अनेक कामे या ठेकेदारामार्फत सुरू आहेत. टक्केवारी मिळत असल्याने या ठेकेदाराची बिले काम पूर्ण होण्यापूर्वीच काढली जातात. विशेष म्हणजे कामाच्या दर्जाबाबत एकही अधिकारी व पदाधिकारी या ठेकेदाराला जाब विचारत नाही. त्यामुळे या लाडक्या ठेकेदाराने अनेक कामांची अक्षरश: वाट लावली आहे. एलईडी दिव्यांच्या कामाबाबतही असेच झाले आहे. हे दिवे किती व कोणत्या ठिकाणी लावण्यात आले, याचा अधिकृत आकडाही मनपाच्या विद्युत विभागाकडे उपलब्ध नाही.
शुक्रवारी झालेल्या सभेत 1780 पैकी 1600 दिवे बसवले असल्याची माहिती संबंधित अधिकार्‍याने दिली. परंतु एलईडी दिवे बसवलेल्या ठिकाणांची यादी या विभागाकडे उपलब्ध नाही. त्यामुळे ही माहिती सपशेल खोटी असल्याचे स्पष्ट होते. एलईडी दिवे बसवल्यानंतर त्यांच्या देखभाल व दुरूस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदाराची आहे. परंतु कामाचे बिले मिळताच ठेकेदाराने त्याकडे पाठ फिरवली. त्यामुळे अनेक एलईडी दिवे वर्षभरात बंद पडले. काही ठिकाणी तर एलईडी दिवे बसवल्याचे केवळ कागदोपत्री दाखवण्यात आले आहे. प्रत्यक्षात अनेक दिवे गायब आहेत. तरी मनपा प्रशासन कोणतीही कार्यवाही न करता गप्प आहे.