आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठेकेदारांच्या बहिष्कारामुळे बाह्यवळण रस्ता अडला; नोव्हेंबरमध्ये काम सुरू होण्याची शक्यता

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - नगर शहराभोवतीचा बाह्यवळण रस्त्याच्या दुरुस्तीचे काम ठेकेदारांनी बहिष्काराचे हत्यार उपसल्याने सुरू होऊ शकले नसल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागातील सुत्रांनी दिली. पहिल्या निविदेला एकाही ठेकेदाराने प्रतिसाद दिला नसल्याने पुन्हा निविदा जाहीर करण्यात आली आहे. यावेळी प्रतिसाद लाभून प्रत्यक्षात काम नोव्हेंबर महिन्यात सुरू होईल, अशी सार्वजनिक बांधकाम विभागाला आशा आहे. 
 
शहरातील जड वाहतूक टाळण्यासाठी तीन वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून तयार झालेल्या बाह्यवळण रस्त्याची पुरती वाट लागली आहे. या रस्त्यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्यात आला होता. पण अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे नगर हा रस्ता आता पूर्ण नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. मनमाड रोड ते कल्याण रोडपर्यंतचा रस्ता चार चाकी, तर सोडाच पण, दुचाकी चालवण्याच्याही लायकीचा राहिलेला नाही. या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे त्यावरून जाणारे मोठे ट्रक उलटून अपघात होत आहेत. आता नाइलाजाने बहुसंख्य अवजड वाहने शहरातून जात आहेत. गेल्या एप्रिल महिन्यात या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी खासदार दिलीप गांधी यांच्या प्रयत्नांतून १६ कोटींचा निधी मिळाला, पण दुरुस्तीचे काहीच काम सुरू होऊ शकले नाही. हा रस्ता आता कुचकामी ठरला आहे. 
 
रस्त्याचे काम सुरू होण्याचे कारण म्हणजे ऑगस्ट महिन्यात या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी १६ कोटींच्या निविदेची सूचना जाहीर करण्यात आली. तिचा कालावधी ४५ दिवसांचा होता. तो संपला तरी एकही ठेकेदाराने हे काम करण्यात रस दाखवला नाही. त्यामुळे तीन ऑक्टोबर रोजी पुन्हा दुसरी निविदा जाहीर करण्यात आली आहे. तिचा मुदतीचा कालावधी १५ दिवसांचा आहे. या निविदेपूर्वीची बैठक शुक्रवारी (१३ ऑक्टोबर) नाशिक येथे होणार आहे. या बैठकीनंतर ठेकेदार निविदा भरतील, अशी सार्वजनिक बांधकाम विभागाला आशा आहे. सर्व काही अंदाजाप्रमाणे झाले, तर नोव्हेंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होण्याची शक्यता आहे.
 
रस्त्याचे तंत्रच सदोष 
हा रस्ता अत्यंत निकृष्ट तंत्राने चांगला पाया करताच तयार झाला आहे. त्यावरून जाणाऱ्या वाहनांच्या क्षमतांचाही विचार त्यावेळी करता हा रस्ता तयार केल्याने ही अवस्था ओढवल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचेच अधिकारी सांगतात. अत्यंत मोठ्या प्रमाणात असलेल्या अवजड वाहतुकीमुळे या रस्त्याची अल्पावधीत वाट लागली आहे. मोठे कंटेनर अवजड वाहतूक या रस्त्यावरून होते. याची जाणीव असतानाही इतका कमकुवत रस्ता कसा तयार झाला, याची उत्तरे संबंधित कोणीही देत नाही. 
 
नगर शहरातील रस्त्यांची लागली आहे वाट 
मोठेखड्डे, त्यात टाकलेली माती यामुळे अवजड वाहनांचे चालक या रस्त्याने येण्यास नाखूष असतात. सध्या ते नगर परिसरात रात्री येऊन शहरातून जात आहेत. पोलिसांना चिरीमिरी देऊन मोठे कंटेनर दिवसा ढवळ्या शहरात घुसत आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांचीही वाट लागत आहे. शिवाय वाहतुकीची कोंडी होऊन अपघातांचीही मोठी भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे बाह्यवळण रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून सर्व वाहतूक शहराबाहेरून वळवावी, अशी नागरिकांची वाहन चालकांची मागणी आहे. रस्त्यावरील धुळीमुळे नागरिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. 
 
आयआयटी अहवालाप्रमाणे रस्ता? 
यारस्त्यावरील वाहतूक, तसेच मल्टिअॅक्स वाहनांच्या वर्दळीचे सर्वेक्षण पवईच्या ‘आयआयआटी’कडून (इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी) केला आहे. त्यात या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी काही सूचनाही केल्या आहेत. हा रस्ता दुरुस्तीसाठी १६ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम दर्जेदार होण्याबाबत प्रश्नचिन्ह आहे. आता हा रस्त्याची दुरुस्ती होताना या अहवालातील शिफारशींचा विचार होणार का, असा प्रश्नही या निमित्त पुन्हा उपस्थित झाला. 
 
पाच किलोमीटरसाठी एक तास 
सध्याया रस्त्यावर आता इतके मोठे खड्डे झाले अन् प्रचंड धुळीचे साम्राज्य झाल्याने एमआयडीसी ते कल्याण रोड दरम्यानच्या चार-पाच किलोमीटर रस्ता पार करण्यासाठी एका तासापेक्षा अधिक वेळ लागत आहे. त्यामुळे अवजड वाहने पुन्हा शहरातून जाऊ लागली आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांवरचा वाहतुकीचा ताण वाढण्याबरोबरच अपघातांची भीती वाढली आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे हस्तांतरित करण्याची फक्त चर्चाच राहिली आहे. त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. 

काही ठिकाणी खड्डे रस्त्याच्या दोन्ही टोकांपर्यंत असल्याने वाहन चालकांना ते टाळणे शक्य नाही. शहरातील रस्त्यावरील अवजड वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी बांधण्यात आलेला वळण रस्ता पूर्ण खराब झाला आहे. कल्याण रोड ते एमआयडीसी दरम्यानच्या रस्त्यावर दोन फुटांचे खड्डे पडल्याने त्यातून जाताना वाहने उलटण्याचे प्रकार घडत आहेत. सध्या हा रस्ता चिखलात हरवला आहे. 
 
 
बातम्या आणखी आहेत...