आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकृष्ट काम करणा-या ठेकेदाराची अनामत जप्त

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - श्रीक्षेत्र कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट येथे तीर्थक्षेत्र विकास निधीतून बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहांसह इतर कामांसंदर्भात सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यानंतर संबंधित ठेकेदाराची अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई जिल्हा परिषदेने केली आहे. या अनामत रकमेतून दुरुस्ती करण्यात येत आहे. परंतु, ठेकेदाराचा शोध लागत नसल्याने जिल्हा परिषदेने केलेला पत्रव्यवहार पुन्हा जिल्हा परिषदेकडे आहे.

पाथर्डी तालुक्यातील मढी येथील श्रीक्षेत्र कानिफनाथ देवस्थान येथे ब वर्ग तीर्थक्षेत्र विकास निधीतून स्वच्छतागृहांसह इतर काम सुमारे ३६ लाख रुपये खर्चून करण्यात आले. हे काम दर्जेदार नसल्याच्या तक्रारी देखील जिल्हा परिषदेकडे करण्यात आल्या होत्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाथर्डी उपविभागाच्या उपअभियंत्यांनी पाहणी करून अहवाल सादर केला. या अहवालानुसार ठेकेदारांना २३ डिसेंबरला १५ दिवसांत काम पूर्ण करण्याच्या नोटिसा दिल्या. त्यानुसार काम करण्यास विलंब केल्यास निविदेतील अटी शर्तीनुसार कामापोटी कपात करण्यात आलेली सुरक्षा अनामत रक्कम जप्त करण्याची कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेने स्पष्ट केले होते. तत्कालीन उपअभियंत्यांनाही नोटिसा बजावल्या होत्या, त्यांचा खुलासा प्राप्त झाला आहे. ठेकेदाराचा कार्यालयात असलेल्या पत्त्यावर जिल्हा परिषदेने पत्रव्यवहार केला, परंतु संबंधित ठेकेदार त्या पत्त्यावर नसल्याने पत्र पुन्हा जि. प. ला आली आहेत. त्यामुळे ठेकेदाराचा शोध घेण्यात वेळ न घालवता अनामत सुमारे ६५ हजारांची रक्कम जप्त केली. यातून स्वच्छतागृहांच्या प्लंबिंगसह इतर कामांची दुरुस्ती करण्यास दुसरा ठेकेदार नियुक्त केला. यासंदर्भात सदस्य योगिता राजळे यांनी मागील महिन्यात झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रश्न उपस्थित करून अधिका-यांना धारेवर धरले होते. त्यानुसार बांधकाम विभागाने अनामत रकमेच्या जप्तीची कारवाई केली.

अधिका-यांवरील कारवाईचे काय?
तीर्थक्षेत्र निधीतून केलेले काम दुरुस्त करण्याची वेळ आल्याने संबंधित ठेकेदाराने काम निकृष्ट केल्याचे सिद्ध झाले आहे. काम निकृष्ट असतानाही तत्कालीन कार्यकारी अभियंत्यांनी पाहणी करून पूर्णत्वाचा दाखला कसा दिला, संबंधित ठेकेदाराचे बिलही अदा केले. त्यामुळे अधिका-यांवरही संशय बळावला आहे. त्यांची खातेनिहाय चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करणार का, असा सवाल सदस्यांमधून उपस्थित केला जात आहे.

कारवाई करा
संबंधित ठेकेदाराने स्वच्छतागृहासह विहिरीचे कामही निकृष्ट केले. यासंदर्भात अनामत रक्कम जप्त केली असली, तरी संबंधित ठेकेदाराबरोबरच जबाबदार तत्कालीन अधिका-यांवरही कारवाई करण्याची गरज आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांची भेट घेणार आहे.''
योगिता राजळे, सदस्य, जिल्हा परिषद.

जप्त रकमेतून कामे
मढी देवस्थान येथे तीर्थक्षेत्र विकास निधीतून बांधण्यात आलेल्या स्वच्छतागृहाच्या कामात त्रुटी आहेत. यासंदर्भात संबंधित नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. या त्रुटी दूर करण्यासाठी संबंधित ठेकेदाराची अनामत रक्कम जप्त करून त्यातूनच प्लंबिंगसह इतर कामे केली जात आहेत.''
बाळासाहेब भोसले, कार्यकारी अभियंता (दक्षिण) जिल्हा परिषद.