आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Controversial Sampada Credit Society's Appointed Board Change

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वादग्रस्त संपदा पतसंस्थेचे अवसायक मंडळ बदलले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - बहुचर्चित संपदा पतसंस्थेवर नियुक्त करण्यात आलेले अवसायक मंडळ नऊ महिन्यांच्या आत बदलण्यात आले. पतसंस्था चळवळीशी निगडित पदाधिका-यांचे अवसायक मंडळ बरखास्त करून सहकार खात्याचे अधिकारी व्ही. आर. दाते यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय मंडळाच्या नियुक्तीचे आदेश जिल्हा उपनिबंधक दिगंबर हौसारे यांनी दिले आहेत. अंतर्गत मतभेदांतून वसुलीच्या कारवाईत होत असलेल्या विलंबामुळे हा निर्णय घेण्यात आला.

संपदा पतसंस्थेत ठेवी अडकलेल्या ठेवीदारांना तातडीने दिलासा मिळावा, या उद्देशाने संस्था अवसायनात काढण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी घेण्यात आला. ५ एप्रिल २०१४ च्या अंतिम आदेशानुसार संस्थेवर अवसायक मंडळाची नियुक्ती करण्यात आली. राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे यांच्या अध्यक्षतेखाली स्थैर्यनिधी संघाचे पदाधिकारी सुरेश गोरक्षनाथ वाबळे, वसंत हस्तीमल लोढा, ठेवीदार प्रतिनिधी सुरेश नाथाजी म्हस्के, चंद्रभान रामकृष्ण खुळे, शासन प्रतिनिधी महेंद्र तुळशीराम घोडके व लक्ष्मण कृष्णकांत पाटील यांचा समावेश असलेले अवसायक मंडळ नियुक्त करण्यात आले. अवसायक मंडळाने एप्रिलमध्येच कामकाजाला सुरुवात करून वसुलीला प्राधान्य दिले. त्यामुळे ठेवीदारांच्या ठेवपरतीच्या आशा पल्लवीत झाल्या. गेल्या वर्षी दिवाळीत रुजवात करणा-या १९०० ठेवीदारांना ८० लाख रुपयांचे वाटप करण्यात आले. ठेवींच्या चार टक्के रक्कम देण्यात आली. किमान मुद्दल मिळेल, अशी आशा ठेवीदारांमध्ये निर्माण झाली. मात्र, अवसायक मंडळातच बेबनाव निर्माण झाला.

अवसायक मंडळाचे अध्यक्ष कोयटे यांनी ऑक्टोबरच्या मध्यात पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर पंधरा दिवसांतच म्हस्के यांनीही राजीनामा दिला. जिल्हा उपनिबंधकांनी अवसायक मंडळात मेळ बसवण्याचा प्रयत्न केला. कोयटे यांनी जानेवारीच्या सुरुवातीस पुन्हा कामकाजास सुरुवात केली. मात्र, बेबनाव कायम होता. त्यामुळे हे अवसायक मंडळ बरखास्त करत जिल्हा उपनिबंधकांनी ३१ जानेवारीला नवीन अवसायक मंडळाची नियुक्ती केली.

पूर्वीच्या अवसायक मंडळातील शासन प्रतिनिधी महेंद्र घोडके व लक्ष्मण पाटील यांना कायम ठेवत दाते यांच्या अध्यक्षतेखाली उपलेखापरीक्षक के. एस. गावंडे यांचा समावेश असलेले मंडळ नियुक्त केले. तातडीने पदभार घेऊन कामकाज सुरू करण्याचे आदेश अवसायक मंडळाला देण्यात आले. नवे मंडळ कसा कारभार करते, याकडे सर्व ठेवीदारांचे लक्ष लागले आहे.

वसुली अधिका-यांची नियुक्ती
जिल्हा उपनिबंधक कार्यालयातून कार्यालयीन अधीक्षक पदावरून निवृत्त झालेले एल. एम. बुरा यांची संस्थेवर विशेष वसुली अधिकारी म्हणून दोन महिन्यांपूर्वी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी सन २०११ मध्ये प्रशासकीय मंडळातही त्यांनी संस्थेवर काम केले आहे. त्यांनी जप्ती व वसुलीच्या कामाला सुरुवात केली आहे. वर्षाखेर ठेवीदारांना किमान २५ टक्के ठेवी परत करण्याचे नियोजन सुरू आहे.

ठेव परतीचे आव्हान कायम
संस्थेत आतापर्यंत जवळपास २२०० ठेवीदारांनी २२ कोटी रुपयांच्या ठेवींची रुजवात केली आहे. यापैकी केवळ ८० लाख रुपये ठेवीदारांना परत मिळू शकले. या ठेवींच्या रकमेची परतफेड करण्यासाठी वसुलीला गती देण्याची आवश्यकता आहे. सातत्याने होणारे फेरबदलही वसुलीत अडसर ठरत असून नवनियुक्त अवसायक मंडळाकडून ठेवीदारांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.