आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पांढरीपूल एमआयडीसीत दोन गटांमध्ये धुमश्चक्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - बंधाऱ्यात सोडण्यात आलेल्या दूषित पाण्याबद्दल तक्रार करण्यासाठी आलेल्या आंदोलकांना हुसकावून लावण्यावरून दोन गटांत तुफान राडा झाला. हा प्रकार नगर-औरंगाबाद रस्त्यावरील पांढरीपूल-घोडेगाव परिसरात असलेल्या एमआयडीसीतील व्हीआरएस कंपनीसमोर मंगळवारी घडला. शिंगवे तुकाईचे आंदोलक ग्रामस्थ घोडेगावच्या युवकांमध्ये धुमश्चक्री झाली. यात गावठी पिस्तूल, कुकरीसारख्या धारदार शस्त्रांचा वापर झाला. नंतर संतप्त आंदोलकांनी कंपनीत प्रवेश करून काचांची तोडफोड केली. पोलिस घटनास्थळी आल्यानंतर प्रकरण निवळले.
पांढरीपूल-घोडेगावदरम्यान असलेल्या एमआयडीसीत व्हीआरएस कंपनी आहे. कंपनीचे दूषित पाणी शिंगवे तुकाई गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यात सोडले, असा ग्रामस्थांचा आरोप आहे. याप्रश्नी शिंगवे तुकाई येथे मंगळवारी सकाळी ग्रामसभा घेण्यात आली. सभा संपताच उपसरपंच योगेश सुधाकर होंडे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलक कंपनीसमोर गोळा झाले. यावेळी घोडेगाव येथील काही युवक आंदोलकांना रोखण्यासाठी तेथे आले. या युवकांनी गावठी कट्ट्याचा धारदार शस्त्राचा धाक दाखवत शिंगव्याच्या आंदोलकांना हुसकावण्याचा प्रयत्न केला.
शस्त्राच्या धाकामुळे आंदोलक सैरावैरा पळत सुटले. आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या योगेश होंडे यांच्यावर घोडेगावच्या नितीन शिरसाठ, नीलेश मधुकर केदार, चाट्या शेख यांनी हल्ला चढवला. मारामारी सुरू होताच आंदोलक पुन्हा आले. संतप्त जमावाने कंपनीत प्रवेश करत तोडफोड केली. प्रवेशद्वारात असलेले केबिन, कंपनीच्या इमारतीच्या खिडक्यांची काचेची तावदाने, आतील साहित्याची तोडफोड करण्यात आली. दुपारच्या वेळी कंपनीत कमी कामगार असल्यामुळे जमावाला कोणी विरोध केला नाही.

या घटनेची माहिती समजताच शिंगणापूर सोनई ठाण्याचे पोलिस घटनास्थळी आले. नगरहून दंगल नियंत्रक पथकाला पाचारण करण्यात आले. सोनई पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण शिंदे, शिंगणापूर पोलिस ठाण्याचे सहायक निरीक्षक देशमाने, त्यांचे सहकारी तेथे आले. पोलिस आल्यानंतर जमाव पांगला. शेवगावचे उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित शिवथरे हेही पथकासह आले. त्यांनी दंगल नियंत्रक पथकाला सोनई पोलिसांना काही सूचना केल्या.

दोन गुन्ह्यांची नोंद
शिंगवे तुकाईचे उपसरपंच योगेश होंडे यांच्या फिर्यादीवरून सोनई पोलिसांनी नितीन शिरसाठ, नीलेश केदार, चाट्या शेख यांच्याविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलमासह मारहाण, शिवीगाळ, दमदाटी, दंगल, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंदवला.

तर व्हीआरएस कंपनीचे व्यवस्थापक गणेश इघे यांनी अज्ञात जमावाने कंपनीत अनधिकृत प्रवेश करून तोडफोड करून यंत्रसामुग्रीचे नुकसान केल्याची फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोनई पोलिसांनी अज्ञात जमावाविरुद्ध दंगल, तोडफोड, शिवीगाळ, दमदाटी, जीवे मारण्याची धमकी देणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.
तर व्हीआरएस कंपनीचे व्यवस्थापक गणेश इघे यांनी अज्ञात जमावाने कंपनीत अनधिकृत प्रवेश करून तोडफोड करून यंत्रसामुग्रीचे नुकसान केल्याची फिर्याद दिली आहे. त्यानुसार सोनई पोलिसांनी अज्ञात जमावाविरुद्ध दंगल, तोडफोड, शिवीगाळ, दमदाटी, जीवे मारण्याची धमकी देणे, जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा नोंदवला आहे.

गुंड प्रवृत्तीची मदत
कंपनीचे दूषित पाणी बंधाऱ्यात सोडण्याला सोमवारी दुपारी शिंगवे तुकाई ग्रामस्थांनी विरोध केला होता. त्यावरून तणाव निर्माण होताच घोडेगावचे काही युवक तेथे आले. त्यांनी आंदोलकांना गावठी पिस्तूल धारदार शस्त्राचा धाक दाखवत पिटाळले. नंतर आंदोलकांनी पोलिस अधीक्षक सोनई पोलिस ठाण्यात जाऊन झालेला प्रकार सांगितला. मंगळवारी दुपारी पुन्हा आंदोलकांना पिटाळण्यासाठी घोडेगावचे युवक आले. या युवकांना कंपनीच्या प्रशासनानेच पाचारण केल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती.

खरे कारण वेगळेच
एमआयडीसी परिसरातील काही कंपन्यांचे काम सुरू झाले आहे. या परिसरात परराज्यासह स्थानिक युवकही कामाला आहेत. ज्या कंपनीत मंगळवारी राडा झाला, तेथे घोडेगाव परिसरातील युवक कामाला आहेत. या कंपनीत शिंगवे तुकाईच्या युवकांनाही कामाला घ्यावे, अशी ग्रामस्थांची मागणी होती. मात्र, कंपनी प्रशासन या मागणीला भीक घालत नसल्यामुळे ग्रामस्थांनी सांडपाण्याचे कारण पुढे करून कंपनीत तोडफोड केली, अशी चर्चाही राडा झाल्यानंतर कंपनीसमोर गोळा झालेल्या जमावामध्ये सुरू होती.
बातम्या आणखी आहेत...