आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Convicts Bail Rejected In The Case Of Privat Money Lender

सावकारी प्रकरणातील आरोपींचे जामीन अर्ज फेटाळले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्रीरामपूर - सावकारीप्रकरणातील सहाही आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज शुक्रवारी येथील जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळले. त्यामुळे अटक टाळण्याचा त्यांचा प्रयत्न अपयशी ठरणार आहे. तसेच गुन्ह्याच्या तपासाला आता गती मिळणार आहे.

येथील व्यापारी राजेंद्र बाफना यांनी सावकारीला कंटाळून विष प्राशन केले होते. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी काँग्रेस नगरसेवक श्यामलिंग शिंदे याच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी नगरसेवक राजेंद्र पानसरे, काँग्रेसचा शिक्षण मंडळाचा माजी सभापती अशोक ऊर्फ पाशा शिवरकर, रमेश शिंदे, वसंत आसने, जयेश परमार, काशिनाथ तेलोरे या सात जणांविरुद्ध खंडणी, दरोडा, बेकायदा सावकारी, जिवे मारण्याची धमकी, अपहरण आदी कलमांन्वये गुन्हा नोंदवला.

शिंदे यास तत्काळ अटक करण्यात आली. इतर आरोपींनी मात्र कोपरगाव येथील न्यायालयातून अटकपूर्व अंतरिम जामीन मिळवला होता. त्यांचे जामीन रद्द करण्यासाठी पोलिसांनी येथील जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला. त्यावर आज न्यायाधीश एन. के. चव्हाण यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यांनी आरोपींचे जामीन अर्ज रद्द केले. आरोपींचे वकील बाबा औताडे वसंत शेळके यांनी काम पाहिले. आता या प्रकरणाचा तपास करणारे पोलिस निरीक्षक गोकुळ औताडे सहायक पोलिस निरीक्षक सचिन वांगडे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी पोलिस निरीक्षक राजेंद्र पडवळ हे बदलून आले आहेत. शहर पोलिस ठाण्यात कार्यभार स्वीकारल्यानंतर पठाणी सावकारीचा पहिलाच गुन्हा त्यांच्याकडे तपासासाठी आला आहे. सरकारी वकील भानुदास तांबे यांनीही तपास अपूर्ण असल्याने आरोपींना अटकपूर्व जामीन देऊ नये, अशी मागणी केली होती.

शिंदे पुन्हा रुग्णालयात
अटककरण्यात आलेला मुख्य आरोपी नगरसेवक श्यामलिंग शिंदे हा छातीत दुखत असल्याने तब्बल १२ दिवस पुणे येथील ससून रुग्णालयात दाखल होता. त्यानंतर पोलिसांनी केलेली मागणी मान्य करीत न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. मात्र, शुक्रवारी पुन्हा एकदा आजारपणामुळे तो रुग्णालयात दाखल झाला आहे. त्यामुळे तपासातील अडथळे वाढले आहेत.