आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भीती : पतसंस्था ठेवीदारांत घबराटीचे वातावरण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - ठेवी परत करण्यास असमर्थ ठरणा -या काही पतसंस्थांमुळे जिल्ह्यातील पतसंस्था चळवळच धोक्यात येण्याची शक्यता आहे. संपदा, जिव्हेश्वर आदी पतसंस्थांमधील ठेवीदार ठेव परत मिळावी, यासाठी गेल्या साडेतीन वर्षांपासून दारोदार फिरत असतानाच त्यामध्ये आणखी काही ठेवीदारांची भर पडली आहे. रावसाहेब पटवर्धन पतसंस्था ठेव परतीस असमर्थ ठरल्याने इतर पतसंस्थांतील ठेवीदारही अस्वस्थ झाले आहेत.

जिल्ह्यात पगारदारांच्या 220, तर इतर 897 पतसंस्था आहेत. बँकांच्या तुलनेत तातडीने उपलब्ध होणारे कर्ज व जास्त व्याजदर यामुळे ठेवीदार पतसंस्थांना प्राधान्य देतात. त्यामुळे या पतसंस्थांकडे कोट्यवधींच्या ठेवी जमा आहेत. मात्र, संचालक मंडळाचे दुर्लक्ष व व्यवस्थापकांच्या मनमानी कारभारामुळे काही पतसंस्था डबघाईला आल्या आहेत. यात संपदा पतसंस्थेचे नाव अग्रक्रमाने येते. जानेवारी 2010 पासून संपदाच्या ठेवीदारांना त्यांच्या हक्काच्या ठेवींची प्रतीक्षा आहे. मात्र, पोकळ आश्वासनांशिवाय ठेवीदारांच्या हाती काहीही पडले नाही. 19 हजार ठेवीदारांच्या 32 कोटी रुपयांच्या ठेवी या संस्थेत अडकल्याचे सुरुवातीपासून सांगण्यात येते. मात्र, ही आकडेवारी फुगवलेली असल्याचे साडेतीन वर्षांनंतर उघडकीस येत आहे. ही संस्था अवसायनात काढून वसुलीचे काम जिल्हा पतसंस्था फेडरेशनकडे दिल्यानंतर खरी आकडेवारी समोर आली. त्याचदरम्यान शहरात कार्यरत असलेल्या जिव्हेश्वर पतसंस्थेतील गोंधळ पुढे आला. या संस्थेतील ठेवीदारांनाही अद्याप ठेवी परत मिळालेल्या नाहीत. किरकोळ कारवाई वगळता संबंधित संस्थांचे संचालक आज उजळ माथ्याने समाजात वावरत आहे.

तीन वर्षांनंतर रावसाहेब पटवर्धन संस्थेच्या निमित्ताने पतसंस्था व ठेवीदारांमध्ये पुन्हा खळबळ माजली आहे. कर्जवसुली रखडल्याने ठेवीदारांचे पैसे देण्यास असमर्थ ठरलेल्या पटवर्धन संस्थेवर सहकार विभागाने पालक अधिका-यांची नियुक्ती केली असून त्यांच्या सल्ल्याने आता कामकाज करण्यात येणार आहे. बुधवारी पाइपलाइन रस्त्यावरील मुख्य शाखेत ठेवीदारांसमवेत बैठक घेऊन पालक अधिकारी एल. एम. बुरा यांनी ठेवीदारांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. कर्जवसुलीतून ठेवी परत देण्यासाठी विलंब लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मंगळवारी संस्थेच्या सर्व शाखा बंद करण्यात आल्या होत्या. गुरुवारपासून या सर्व शाखांचे कामकाज सुरू करण्याच्या सूचना बुरा यांनी दिल्या आहेत. संस्थेच्या अध्यक्ष लतिका पवार यांनीही ठेवीदारांना संस्थेची अडचण समजावून सांगत संयम बाळगण्याचे आवाहन केले. जुलै अखेरपर्यंत मुख्य कार्यालयासह संस्थेच्या सर्व दहाही शाखा सुरू ठेवण्यात येणार आहेत.
या पार्श्वभूमीवर इतर पतसंस्थांमधील ठेवीदार अस्वस्थ झाले असून ठेवी सुरक्षित असल्याची खातरजमा करण्यात येत आहे. काहींनी ठेवी काढण्यास सुरुवात केल्याने पतसंस्था अडचणीत येण्याची शक्यता आहे.

पुढारीही जबाबदार
रावसाहेब पटवर्धन पतसंस्थेत सुमारे 22 हजार ठेवीदारांच्या 62 कोटी 43 लाखांच्या ठेवी आहेत. मुख्य कार्यालयासह संस्थेच्या दहा शाखा आहेत. 57 कोटी रुपयांच्या कर्जांपैकी दोन बड्या राजकीय नेत्यांकडे संस्थेची कोट्यवधी रुपयांची थकबाकी असल्याची माहिती संस्था प्रशासनाकडून पुढे आली आहे. कर्जदारांची 22 कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता संस्थेच्या नावावर असून जवळपास नऊ कोटी रुपयांची स्वत:ची मालमत्ता संस्थेकडे आहे. मात्र, राखीव निधी नसल्याने अडचणी वाढल्या आहेत.

आजच्या बैठकीकडे लक्ष
जिल्हा पतसंस्था फेडरेशन व स्थैर्यनिधी संघाच्या पुढाकारातून गुरुवारी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाशेजारच्या सभागृहात जिल्ह्यातील पतसंस्थाचालकांची बैठक होत आहे. फेडरेशनचे राज्याचे अध्यक्ष काका कोयटे यावेळी मार्गदर्शन करतील. पतसंस्थांवरील ठेवीदारांचा विश्वास टिकवण्यासाठी या बैठकीत ठोस कृती आराखडा निश्चित होण्याची आवश्यकता ठेवीदारांमधून व्यक्त होत आहे. स्थैर्यनिधी संघाच्या स्थापनेचा महत्त्वपूर्ण निर्णयही कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला होता.