आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोअर बँकिंगमध्ये 1कोटीचा गैरव्यवहार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जे काम सुमारे 75 लाखांत होते, त्यासाठी जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांनी 1 कोटी 76 लाख 42 हजार रुपये खर्च केले. यात सुमारे 1 कोटीचा गैरव्यवहार केल्याचे वार्षिक अहवालात स्पष्ट दिसत असल्याचा आरोप गुरुकुल मंडळाच्या उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष अनिल आंधळे, बँकेचे माजी अध्यक्ष संजय धामणे व गुरुकुल मंडळाचे अध्यक्ष नितीन काकडे यांनी केला आहे.

बँकेने कोअर बँकिंग सॉफ्टवेअरसाठी तब्बल 58 लाख अदा केले आहेत. त्यावर 9 लाख 9 हजारांचा कर भरला आहे. हार्डवेअरसाठी 96 लाख व त्यावर 7 लाख 19 हजारांचा कर भरल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. बीएसएनएलसाठी 6 लाख 13 हजार रुपये भरले असताना संगणकाच्या नावाखाली केलेला स्वतंत्र 23 लाखांचा खर्च संशय उत्पन्न करणारा आहे. कोअर बँकिंगमध्ये सुमारे एक कोटीचा गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट दिसते, असे निवेदनात म्हटले आहे.
हा आरोप मान्य नसल्यास संचालकांनी या कामासाठी सर्व कंपन्यांच्या निविदा सभासदांसमोर मांडाव्यात, असे आव्हानही देण्यात आले आहे. हा खर्च करण्यास नकार दिल्यामुळे बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी केशव ढाकणे यांना या संचालक मंडळाने राजीनामा देण्यास भाग पाडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. सत्ताधारी संचालकांच्या अशा कारभारामुळे कोणी हे पद स्वीकारण्यास तयार नसल्याचे विरोधी संचालकांचे म्हणणे आहे.

येत्या 20 जुलै रोजी बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा आहे. या सभेत या खर्चाला मंजुरी मिळू देणार नाही, अशी भूमिका रा. या. औटी, राजेंद्र जायभाय, उमेश मेहेत्रे, माधव लांडगे, मिलिंद पोटे, संजय कुलकर्णी, संतोष डमाळे यांनी घेतली आहे.
केव्हाही चर्चेस तयार
आम्ही बँकेतील कोअर बँकिंगच्या खर्चाबाबत सर्व आकडेवारी वार्षिक अहवालात छापली आहे. त्यात आम्ही खरेदी केलेल्या बाबींच्या किमती विरोधकांना कधीही आॅनलाइन पहावयास मिळू शकतात. बँकेच्या सभेपूर्वी विरोधकांचे शंकानिरसन व्हावे, या उद्देशाने आम्ही मंगळवारी सर्व विरोधकांना चर्चेसाठी बोलवले होते. गुरुकुल मंडळ वगळता सर्वजण आले. त्यांच्या शंकांचे आम्ही निरसन केले, त्यांच्या सूचना ऐकल्या. ‘गुरुकुल’च्या नेत्यांनी समोर यावे. सगळे त्यांच्यासमोर ठेवू व त्यांच्या शंकांचे निरसन करू. त्यांच्या योग्य सूचनांचा आम्ही विचार करू.’’ महादेव गांगर्डे, अध्यक्ष, प्राथमिक शिक्षक बँक.
30 पानांचा अहवाल; 15 पानांचाच ताळेबंद
गेल्या आर्थिक वर्षाचा अहवाल 30 पानांचा आहे. त्यात फक्त 15 पानांत आर्थिक ताळेबंद व उरलेल्या 15 पानांत फोटो आहेत. प्रेरणास्थान म्हणून ज्यांच्या काळात बँकेचे नुकसान झाले, त्यांचे फोटो झळकत आहेत. यांच्यापासून कोणती प्रेरणा घ्यायची, असा खोचक सवाल विरोधकांनी उपस्थित केला आहे.