आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त कोअर बँकिंगला अखेर मुहूर्त, दोन कोटींच्या खर्चावर विरोधकांचा आक्षेप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - प्राथमिक शिक्षक बँकेतील वादग्रस्त ठरलेल्या कोअर बँकिंग प्रणालीला रविवारी (९ ऑगस्ट) मुहूर्त लाभणार आहे. या प्रणालीच्या उद्घाटनासाठी पालकमंत्री राम शिंदे हजेरी लावणार आहेत. या प्रणालीसाठी एक कोटीपर्यंत खर्च अपेक्षित असताना दोन कोटींपर्यंत खर्च करण्यात आला असल्याचा आरोप विरोधी मंडळांनी केला आहे. याप्रकरणी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडेही तक्रारी झाल्या आहेत. केवळ बँकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हे उद्घाटन उरकण्यात आल्याचाही आरोप सत्ताधाऱ्यांवर केला जात आहे.

जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेत सत्ताधारी विरोधक हा वाद नेहमीच धुमसत असतो. पण कोअर बँकिंग प्रणालीच्या मुद्द्यावर विरोधी मंडळांनी वेळोवेळी आंदोलने केली. याप्रकरणी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे तसेच सहकारमंत्र्यांपर्यंत यापूर्वी तक्रारी झाल्या आहेत. सभासदांच्या हितासाठी असलेल्या बँकेत सभासदांच्या हक्काचा सत्ताधारी संचालक मंडळ कधीच विचार करत नाही, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने पतसंस्था सहकारी बँकांना दिलेल्या निर्देशानुसार सुरळीत व्यवहारासाठी सभासदांना कोअर बँकिंग सुविधा देण्याचा निर्णय जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेने घेतला. मात्र, मोठा निधी खर्च होऊनही त्यात फारशी प्रगती होऊ शकली नाही. पदाधिकाऱ्यांनी "आलेल्या निविदा किती पैशाच्या आहेत हे दाखवावे,' अशी मागणीही यापूर्वी केली होती. बँकेने गेल्या वर्षी सभासदांना दिलेल्या लाभांशापेक्षा यंदा कमी लाभांश दिला, कर्जवितरणही बंद आहे. याला कोअर बँकिंग प्रणालीचे कारण पुढे केले जात असल्याचा आरोप होत आहे.

वादग्रस्त ठरलेल्या या प्रणालीवर सत्ताधारी अजूनही विरोधकांच्या शंकांचे निरसन करण्यात अयशस्वी ठरले आहेत. कोअर बँकिंग प्रणालीसाठी कोटीच्या आत खर्च येणे अपेक्षित असताना हा खर्च दोन कोटींपर्यंत नेण्यावर विरोधकांचा आक्षेप आहे. सामान्य सभासद मात्र, या संपूर्ण प्रकारामुळे गोंधळून गेला असून नेमके खरे काय याचा शोध सभासदांकडून सुरू आहे. उपनिबंधकांकडून तक्रारीची दखल घेतली जात नसल्याने शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. रविवारी या कोअर प्रणालीचे उद्घाटन होणार आहे.
कोअर प्रणाली अजूनही शंभर टक्के कार्यान्वित नाही. या प्रणालीसंदर्भात उपस्थित केलेल्या शंकांचे निरसन केले नाही. कोअरच्या मुळ प्रस्तावापेक्षाही २३ लाखांचा अतिरिक्त खर्च केला. त्यामुळे इतर संघटनांशी चर्चा करून आंदोलनाची दिशा ठरवू.'' आबासाहेबजगताप, शिक्षकनेते, प्राथमिक शिक्षक संघ.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप
कोअरप्रणालीचे काम पूर्ण झाले असताना जास्तीचा खर्च केल्याचा आरोप होतो. पण बँकेने स्वत:चे डेटा सेंटर करून ही प्रणाली कार्यान्वित केली. त्यामुळे विरोधकांनीच निवडणूक डोळ्यासमोर ठेवून आरोप केले आहेत. हप्त्यासंदर्भात अडचणी येत होत्या त्यामुळेच उद्घाटनाला विलंब झाला.'' संतोषगायकवाड, अध्यक्ष,शिक्षक बँक.

निवडणूक डोळ्यासमोर ठेवून उद्घाटन
कोअर प्रणालीचा खर्च पावणेदोन कोटींवर गेला आहे. डिडीआरकडे तक्रारी केल्या. पण चौकशी झाली नाही. कर्जाचे जास्तीचे हप्ते येत आहेत. बँक म्हणते, कोअर प्रणालीचे काम सुरू असल्याने असे होते. खटाटोप केवळ बँकेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केला जातो.'' संजयकळमकर, शिक्षकनेते, गुरुकुल.

सत्ताधाऱ्यांचा कारभारच चुकीचा
कोअरबँकिंग प्रणालीसंदर्भात आम्ही चार ते पाचवेळा उपनिबंधकांकडे पत्रव्यवहार केला आहे. कोअर प्रणालीचा कोणत्याही सभासदाला अजून, तरी फायदा नाही. एका संस्थेच्या २३ शाखा असताना २५ लाखांत कोअर प्रणाली सुरू झाली. बँकने दोन कोटींपर्यंत खर्च दाखवला. सत्ताधाऱ्यांनी चुकीचा कारभार चालवला आहे.'' रावसाहेबरोहोकले, शिक्षकनेते, गुरुमाउली मंडळ.

उद्घाटनालाच निषेध
कोअरबँकिंगचे उद्घाटन रविवारी होणार आहे. पण काही विरोधी शिक्षक संघटनांनी उद्घाटनाच्या दिवशीच सत्ताधाऱ्यांचा निषेध करण्याची रणनिती आखली आहे. त्यासाठी विरोधी संघटनांनी परस्पर संपर्क वाढवला आहे. त्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या कोअर बँकिंग प्रणालीला आता राजकीय रंग चढू लागले आहेत.