आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरकरांचे सव्वा कोटी गेले खड्ड्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(प्रोफेसर कॉलनी चौक ते प्रेमदान चौक रस्त्यावर चार दिवसांपूर्वी बुजवण्यात आलेले खड्डे पुन्हा उखडले आहेत. नीलक्रांती चौक रस्त्याची अवस्थाही काही वेगळी नाही. छाया: कल्पक हतवळणे)
नगर-महापालिकेने नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे. मनपाचा इतिहास पाहता खड्डयांच्या मलमपट्टीसाठी (पॅचिंग) पाच वर्षांत तब्बल सव्वा कोटी रुपये खर्च झाले. आता या खड्डयांवर पुन्हा लाखो रुपयांचा खर्च सुरू आहे. बुजवलेले हे खड्डे किती दिवस टिकतील, याबाबत शंकाच आहे. नगरकरांकडून वसूल केलेल्या विविध करांच्या रकमेतून हा खर्च करण्यात आला, तरीदेखील चांगले रस्ते मिळणे ही नगरकरांची शोकांतिकाच आहे.

नूतन महापौर अभिषेक कळमकर यांनी पदभार घेताना खड्डे बुजवण्याच्या कामास प्राधान्य देणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार त्यांनी या कामास सुरूवातही केली. गेल्या पाच वर्षात खड्डे बुजवण्यासाठी तब्बल सव्वा कोटी रुपये खर्च झाले. हा खर्च केवळ कागदोपत्रीच आहे. एकदा खड्डा बुजवला की, महिनाभरात त्याच ठिकाणी पुन्हा खड्डा तयार होतो. खड्डा भरताना त्यात खडी टाकता माती, विटांचे तुकडे, तसेच केरकचरा टाकण्यात येतो. गेल्या पाच वर्षांपासून खड्डे बुजवण्याचे हे चक्र असेच सुरू आहे. त्यामुळे महापौर कळमकर यांनी आतापर्यंत झालेल्या खर्चाचा विचार करणे आवश्यक आहे. खड्डे बुजवण्याचे काम म्हणजे "पुढे पाठ मागे सरसपाट' अशातील प्रकार आहे. त्यात केवळ ठेकेदाराचा खिसा भरला जातो. त्याची काळजी कळमकर यांनी घ्यावी, अशी नगरकरांची अपेक्षा आहे.

मुंबई महानगरपालिका प्रांतिक अधिनियम १९४९ च्या कलम ४८४ नुसार नगरसेवक, पदाधिकारी अधिकाऱ्यांनी जनतेचे सेवक म्हणून काम करणे अपेक्षित आहे. दर्जेदार रस्त्यांच्या सुविधेसह शहर स्वच्छ, सुंदर ठेवण्याची जबाबदारी त्यांचीच आहे. मात्र, शहरातील रस्त्यांची दुरवस्था पाहता नगरसेवकांना त्यांच्या जबाबदारीचा विसर पडल्याचे स्पष्ट होते. दिल्लीगेट ते पत्रकार चौक, नेप्तीनाका चौक ते आयुर्वेद कॉलेज, लालटाकी ते सर्जेपुरा चौक, प्रोफेसर कॉलनी चौक ते भिस्तबाग नाका आदी रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. मध्यवर्ती शहर उपनगरातील अंतर्गत रस्त्यांची परिस्थितीही यापेक्षा वेगळी नाही. पावसाळा सुरू झाला असून आतापर्यंत झालेल्या पावसात अनेक रस्त्यांवर गुडघाभर खोल खड्डे तयार झाले आहेत. या जीवघेण्या खड्डयांमुळे नगरकरांची माेठी गैरसोय होत आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून अनेकांना अपघातांनाही सामोरे जावे लागले आहे. खड्ड्यात आदळल्याने वाहनांचे तर नुकसान होतेच, शिवाय पाठदुखी मानदुखीच्या विकारांनाही अनेकांना सामोरे जावे लागले आहे.

केबल टाकण्यासाठी रिलायन्स कंपनीने कुष्ठधाम रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खोदकाम केले होते. रिलायन्सने नुकसान भरपाईपोटी दिलेल्या पैशांचाही गैरवापर करण्यात आला. हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर कुष्ठधाम रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात आले. मात्र, काही दिवसांतच ते पुन्हा उघडे पडले. आता या खड्डयांवर पुन्हा लाखो रुपये खर्च होणार आहेत. या रस्त्यावर वाहनांची मोठी वर्दळ असते. खड्डयांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

कराच्या बदल्यात नगरकरांना खड्डे
नागरिकवृक्ष कर, शिक्षण कर, रस्ते, सफाई, जलनि:सारण, पाणीट्टी, घरपट्टी अशा विविध प्रकारच्या १४ करांचा भरणा मनपाकडे करतात. मात्र, त्या बदल्यात त्यांना खड्डयांनी भरलेले रस्ते मिळतात. नागरिकांनी अर्ज, निवेदन, तक्रार आंदोलने करूनही रस्त्यांवरील खड्डयांची स्थिती जैसे थे आहे. त्यामुळे तक्रार किती वेळा कोणाकडे करावी, असा प्रश्न नागरिकांसमोर निर्माण झाला आहे.

मोठे खड्डे प्राधान्याने बुजवण्यास प्राधान्य
महापौरांच्या आदेशानुसार शहरातील खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पावसाळा सुरू झाल्याने डांबर टाकून खड्डे बुजवता येणार नाहीत. त्यासाठी वेटमिक्स पध्दतीने खड्डे बुजवण्यात येत आहेत. केवळ ठरावीक मार्गच नव्हे, तर सर्वच रस्त्यांवरील मोठे खड्डे प्राधान्याने बुजवण्यात येणार आहेत. केडगाव, नागापूर-बोल्हेगाव मुकुंदनगर उपनगरातील खड्डेही बुजवण्यात येतील. नंदकुमार मगर, शहरअभियंता.

रस्त्यांचे पॅचवर्क
*२००८- ०९ (६२ लाख)
*२००९ - १० (५ लाख ६२ हजार)
*२०१० - ११ (२१ लाख ८६ हजार)
* २०११ - १२ (९ लाख)
* २०१२ - १३ (५ लाख २० हजार)
* २०१३ - १४ (१२ लाख)
* २०१४ - १५ (१६ लाख १३ हजार)

बातम्या आणखी आहेत...