आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेला अनुदान स्वरूपात विशेष निधी : महापौर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - जकात व एलबीटीच्या उत्पन्नातील तूट भरून काढण्यासाठी तेराव्या वित्त आयोगातून अनुदान स्वरूपात विशेष निधी महापालिकेला देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले असल्याची माहिती महापौर शीला शिंदे यांनी शुक्रवारी दिली.

जकात बंद झाल्याने संकटात सापडलेल्या मनपाला शासनाकडून अनुदान स्वरूपात विशेष निधी द्यावा, अशी मागणी महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. निवेदनात म्हटले आहे की, हद्दवाढीतील 12 गावांची नागरी सुविधांची अपेक्षा वाढली आहे. मात्र, मनपाचे उत्पन्नाचे स्त्रोत व नागरी सुविधांच्या मागणीनुसार खर्च करणे जिकिरीचे झाले आहे. शहरासाठी 34 किलोमीटर अंतरावरील मुळा धरणातून पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी मनपाला दर महिन्याला दीड कोटीचे वीजबिल भरावे लागते. शिवाय पाणीपुरवठा यंत्रणेच्या देखभालीचा खर्चही मोठय़ा प्रमाणात आहे. त्यातच जकात बंद झाल्याने मनपाच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला आहे. आतापर्यंत सुमारे 22 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे जकात व एलबीटीच्या उत्पन्नातील तूट भरून निघेल एवढी रक्कम शासनाने अनुदान स्वरूपात द्यावी, तसेच शासनाने ‘अ’ वर्ग महापालिकांच्या धर्तीवर नगर महापालिकेला हद्दवाढ झालेल्या गावांच्या विकासासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महापौरांनी केली.