आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महापालिकेची सत्ता गुंडांच्या ताब्यात; आमदार अनिल राठोड यांचे सत्ताधार्‍यांवर टीकास्त्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. सत्ताधार्‍यांना नागरिकांच्या प्रश्नांचे काहीच देणे-घेणे नाही. ते केवळ पैसे खाण्यात मग्न आहेत. गुंडांच्या ताब्यात सत्ता गेल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे. या गुंडगिरीला कंटाळून काही अधिकारी रजेवर गेले आहेत, असा आरोप आमदार अनिल राठोड यांनी गुरुवारी केला. सत्ताधारी केवळ विकासाच्यापोकळ गप्पा मारत आहेत. त्यामुळेच बससेवा बंद पडली, अशी टीकाही त्यांनी केली.

शहर बससेवा बंद झाल्याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे माळीवाडा बसस्थानक चौकात निदर्शने करण्यात आली त्या वेळी राठोड बोलत होते. माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक विक्रम राठोड, गणेश कवडे, दत्ता मुदगल, संजय चोपडा, अनिल बोरुडे, निर्मला धुपधरे, सुषमा पडोळे, अरुणा गोयल आदी या वेळी उपस्थित होते.

राठोड म्हणाले, ज्यांना बससेवा चालवता आली नाही ते शहराचा काय विकास करणार? विकासाच्या पोकळ गप्पा मारून नागरिकांची दिशाभूल करणार्‍यांनी सत्तेवरून पायउतार व्हावे. बससेवा बंद होऊन आठ दिवस उलटले, तरी सत्ताधारी केवळ पर्याय शोधण्याच्या घोषणा करत आहेत. बससेवा बंद पडण्यापूर्वी त्यांना पर्याय शोधता आला नाही. या निष्क्रियतेमुळेच जनतेला विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

युतीच्या कार्यकाळात शासनाकडे बससेवेसाठी 33 कोटींचा प्रस्ताव पाठवण्यात आला होता. तो मंजूर करण्यासाठी सत्ताधार्‍यांनी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे राठोड यांनी सांगितले. बंद झालेली बससेवा 24 तासांत सुरू करा, अशी नोटीस मनपाने प्रसन्ना पर्पलला दिली होती. परंतु पुढे काय झाले, ते समजले नाही. शहर बससेवा पुन्हा सुरू करावी; अन्यथा होणार्‍या परिणामास प्रशासन जबाबदार असेल, असा इशारा शिवसेनेने दिला.
‘प्रसन्ना पर्पल’चा मानभावीपणा
आर्थिक अडचणींमुळे सेवा नाइलाजाने बंद करावी लागली. केंद्र शासनाने 2012-13 या वर्षासाठी उत्कृष्ट परिवहन सेवा म्हणून या बससेवेचा गौरव केला होता. नगरमध्ये बससेवा अविरत कार्यरत असावी, अशीच संस्थेची इच्छा आहे. जी संस्था बससेवा पुरवण्यास इच्छुक असेल त्या संस्थेस हवे ते सहकार्य करण्यास आम्ही तयार आहोत, असे मानभावीपणाचे पत्र ‘प्रसन्ना पर्पल’चे येथील प्रतिनिधी दीपक मगर यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
आंदोलनाशिवाय काय केले ?
४राठोड यांनी आंदोलने सोडून दुसरे काहीच केले नाही. याची सवय झाल्याने लोकांना त्याचे कौतुक वाटत नाही. निवडणूक जवळ आली की त्यांचा आंदोलनांचा कार्यक्रम ठरलेला असतो. त्यांच्या आरोपांना योग्य वेळी उत्तर देऊ. आम्ही महापालिकेत भ्रष्टाचार नव्हे तर यांनी अर्धवट सोडलेली कामे पूर्ण करत आहोत. बंद झालेली बससेवाही लवकरच सुरू होईल.’’
संग्राम जगताप, महापौर
(फोटो - शहर बससेवा सुरू करण्यासाठी शिवसेनेतर्फे गुरुवारी आंदोलन करण्यात आले.)