नगर- महापौरपदाच्या निवडणुकीत नगरसेवकांच्या पळवापळवीचे प्रकार घडतात. मात्र, आता नगरसेवकांवर दबाव टाकण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांचीही पळवापळवी सुरू झाली आहे. मुकुंदनगरमधील दर्गादायरा परिसरातील अपक्ष नगरसेविका नसीम शेख यांच्या वडिलांना पळवून नेल्याबद्दल भिंगार कॅम्प पोलिसांनी शिवसेनेचे शहरप्रमुख संभाजी कदम नगरसेवक सचिन जाधव यांच्याविरुद्ध अपहरणाचा गुन्हा नोंदवला आहे. त्यामुळे खळबळ उडाली.
नगरसेविका नसीम शेख यांचा भाऊ नवाजखान यांनी याबाबत कॅम्प पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ३० मे रोजी शिवसेनेचे कदम नगरसेवक जाधव हे दोघे घरी आले. तुमच्या वडिलांशी बोलायचे आहे, असे सांगून त्यांनी खानसाहेब शेख यांना बाहेर बोलावले. बोलण्यात गुंतवून ते खानसाहेबांना दूरवर घेऊन गेले. बराच वेळ झाला, तरी वडील घरी परतले नाहीत, म्हणून नवाजखान यांनी कुटुंबातील इतर सदस्यांसह त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. शोधाशोध करुनही खानसाहेेब सापडले नाहीत. त्यामुळे नवाजखान यांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाणे गाठले.
दरम्यान, याप्रकरणी नगरसेविका नसीम शेख यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह कदम जाधव यांच्यावर सडकून टीका केली आहे.