आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Corruption In Agriculture Yantra Distribution, Divya Marathi

मनमानी पद्धतीने कडबाकुट्टी यंत्रांचे वाटप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद असणा-या शेतक-यांना कृषी विभागाने शुक्रवारी व शनिवारी रात्रीतून सुमारे 15 कडबाकुट्ट्यांचे वाटप केले, असा आरोप शेतक-यांनी केला आहे. याप्रकरणी सोमवारी काही शेतक-यांनी गोंधळ घातल्यानंतर सोडत पद्धतीने उर्वरित 14 कडबाकुट्टी यंत्रांचे वाटप करण्यात आले.

कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या जिल्ह्यातच कृषी विभागाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वैरण विकास कार्यक्रमांतर्गत कृषी विभागामार्फत कडबाकुट्टी यंत्रांचे वाटप केले जाते. त्यासाठी नगर तालुक्यातील सुमारे तीनशे शेतक-यांनी अर्ज केले होते. 31 कडबाकुट्टी यंत्रे वाटपासाठी उपलब्ध झाली. ही यंत्रे शुक्रवारी व शनिवारी रात्री आमदार व खासदारांच्या शिफारशीनुसार वाटण्यात आली. काही गावांत कडबाकुट्ट्या पोहोचल्यानंतर या प्रकाराचा बोभाटा झाला. त्यामुळे संतप्त शेतकरी सोमवारी सकाळी दहापासून कृषी विभागात जमले. शेतक-यांनी यंत्रांची मागणी केल्यानंतर वाटपासाठी अवघी 14 यंत्रे समोर ठेवण्यात आली. शेतक-यांनी उर्वरित यंत्रांबाबत विचारणा केली असता काही यंत्रांचे वाटप झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. यावर शेतक-यांनी यंत्रे कुणाला व कशी वाटली, त्यासाठी कोणते निकष लावले असा सवाल केला. मात्र, प्रशासनाने वेळ मारून नेली. वाटप केलेल्या लाभार्थ्यांची यादी शेतक-यांनी मागितली. परंतु प्रशासनाने यादी दाखवण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे शेतक-यांनी तीव्र संताप व्यक्त करीत कृषी विभागाच्या कारभाराचा निषेध केला.
प्रशासन व शेतकरी असा वाद उभा राहिल्याने उर्वरित 14 यंत्रे कुणाला वाटायची असा प्रश्न निर्माण झाला. उपविभागीय कृषी अधिका-यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मागणीच्या तुलनेत यंत्रे कमी असल्याने सोडत पद्धतीने यंत्राचे वाटप करण्याचे, तसेच एका गावात एकच यंत्र देण्याचे ठरले. पण सुटीच्या दिवशी शनिवारी (24 मे) यंत्रवाटप कुणाच्या आदेशावरून झाले, हा प्रश्न अनुत्तरितच राहिला. यासंदर्भात तालुका कृषी अधिकारी रामदार दरेकर म्हणाले, शनिवारी (24 मे) काही यंत्रांचे वाटप ज्येष्ठता, तसेच प्रलंबित याद्या पाहून करण्यात आले. शिफारशींवरून वाटप केलेले नाही. वाटप नियमानुसारच करण्यात आले.
वाटप करताना अगोदर लाभार्थी निवड केली असावी, त्यानंतरच वाटप झाले. संपूर्ण वाटप नियमानुसार झाले आहे, असे अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले.

सुटीच्या दिवशी वाटली यंत्रे
कृषी विभागात शुक्रवारी (23 मे) कडबाकुट्टी यंत्रे उपलब्ध झाली. शनिवारी सुटी असल्याने शेतकरी सोमवारी कृषी विभागात जमले. त्या वेळी फक्त 14 यंत्रेच वाटपासाठी ठेवल्याने उर्वरित यंत्रे कुठे आहेत, असा प्रश्न पडला. चुकीच्या पद्धतीने प्रशासनाने सुटीच्या दिवशी नियमबाह्य वाटप केले.’’
बाळासाहेब मेटे, शेतकरी