आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियंता सातपुतेप्रकरणी आयुक्तांची भूमिका संशयास्पद, आयुक्तांनी अहवाल दडवला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अस्तित्वात नसलेल्या ठिकाणी पाइपगटारचे काम दाखवून पावणेतीन लाखांचा गैरव्यवहार करणारे महापालिकेचे अभियंता आर. जी. सातपुते यांना पाठीशी घालण्यासाठी आयुक्त विजय कुलकर्णी सध्या विशेष परिश्रम घेत आहेत. काम अस्तित्वात नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले आहे. तसा अहवाल शहर अभियंता नंदकुमार मगर यांनी आयुक्तांना सादर केला. मात्र, आयुक्तांनी हा अहवाल दडवत कामाची पाहणी करण्यासाठी पोलिसांना पुन्हा पत्र दिले आहे. त्यामुळे आयुक्तांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा आहे.

गाडगीळ पटांगण परिसरातील म्हसोबा मंदिर ते पावन हनुमान गणपती कोपरादरम्यान दोन वर्षांपूर्वी इ-निविदेद्वारे सहाशे मिलिमीटर पाइपगटाराचे काम झाल्याचे दाखवून पावणेतीन लाखांचे बिल काढण्यात आले. जाकीर शेख यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात तक्रार देऊन हा गैरव्यवहार निदर्शनास आणून दिला. तोफखाना पोलिसांच्या पत्रानुसार मनपा प्रशासनाने या कामाची चाैकशी केली. या चौकशीत कामच झालेच नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मात्र, अहवाल सादर होऊन महिना उलटला, तरी आयुक्तांनी याबाबत कोणतीच कारवाई केलेली नाही. आयुक्तांच्या पत्राशिवाय पोलिसांनाही पुढील कार्यवाही करणे शक्य नाही. त्यामुळे आयुक्तांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून संबंधितांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याबाबत पत्रव्यवहार करावा, अशी मागणी तक्रारदार शेख यांनी वेळोवेळी केली. परंतु आयुक्तांसह काही नगरसेवकांचे लाडके अभियंता सातपुते यांना वाचवण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. चौकशी अहवाल समोर असतानाही संबंधित कामाची पाहणी करण्यासाठी उपस्थित राहावे, असे पत्र आयुक्तांनी पुन्हा एकदा पोलिसांना दिले आहे. सातपुते यांच्यावर कारवाई करण्याऐवजी आयुक्त वेळकाढूपणाची भूमिका घेत आहेत. त्यांची ही भूमिका संशयास्पद असून त्यामुळे सातपुते यांना अभय मिळत आहे.

अभियंता सातपुते यांच्याविरोधात अनेक तक्रारी आहेत. नगर महाविद्यालयाजवळील कब्रस्तानातील हॉलच्या बांधकामप्रकरणी त्यांना निलंबित करण्यात आले होते. याप्रकरणीदेखील उपायुक्त भालचंद्र बेहेरे यांनी आयुक्तांना चौकशी अहवाल सादर केला आहे. परंतु आयुक्त कुलकर्णी यांनी सातपुते यांच्यावर कारवाई करण्याऐवजी त्यांना पुन्हा कामावर रुजू करून घेतले. याप्रकरणी नगरसेवकांनी सभागृहात आयुक्तांना धारेवर धरले. चौकशी अहवालानुसार सातपुते यांच्यावर कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्तांनी सभागृहाला दिले होते. परंतु आता त्यांना या आश्वासनाचा विसर पडला आहे. सातपुते यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यासाठी आयुक्तांसह काही नगरसेवकांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याची चर्चा महापालिका वर्तुळात आहे.