आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट पावत्या; वाळू तस्करांनी बुडवला लाखोंचा महसूल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- अपरजिल्हाधिकाऱ्यांच्या नावाने बनावट पावत्या तयार करून वाळू वाहतूक होत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बनावट पावत्यांवर लाखोंची वाळू चोरट्या मार्गाने विक्रीसाठी गेली असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे बनावट पावत्या थेट अपर जिल्हाधिकाऱ्यांनाच आढळून आल्याने स्थानिक महसूल प्रशासनाचे वाभाडे निघाले आहे. या बनावटगिरीला स्थानिक महसूल प्रशासनाची मुकसंमती होती की काय? अशी शंका उपस्थित आहे. 

नगर जिल्ह्यात अवैद्य वाळूउपसा वाहतुकीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. या अवैध वाळू उपशावर प्रशासनाचे ही कुठलेच नियंत्रण राहिलेले नाही. कमी वेळा जास्त पैसा मिळत असल्याने ग्रामीण भागात या व्यवसायाकडे प्रतिष्ठेचा व्यवसाय म्हणून पाहिले जाते. नगर जिल्ह्यातील प्रामुख्याने संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर, नेवासे, राहुरी, श्रीगोंदे या तालुक्यांमधील प्रवरा, गोदावरी, मुळा, भीमा नदी पात्रातून दररोज रात्रीच्या वेळी वाळू उपसा सुरू आहे. विशेष म्हणजे रात्रीच्या वाळूउपशावर महसूल प्रशासनाने बंदी घातली आहे, तरी देखील नदीपात्रानजीक असलेल्या गावांमधील अनेक जण ट्रॅक्टरने नदीपात्रातील वाळूचा उपसा करतात. एकीकडे चोरट्या मार्गाने होत असलेल्या वाळूउपशामुळे पर्यावरणाची हानी होत असतानाच कोट्यवधींचा महसूल देखील बुडवला जात आहे, तर दुसरीकडे ऑनलाइन वाळू लिलावांना कमी प्रतिसाद मिळत असल्याने ज्या साठ्यांचे लिलाव झाले नाहीत, तेथूनच वाळूची चोरी होते. त्यामुळे वाळू लिलाव घेण्यासाठी व्यावसायिक पुढे येत नाहीत. 

अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांनी गेल्या आठवड्यात कोपरगाव तालुक्यातील धारणगाव येथील गोदावरी नदीपात्रातील हजार ५९० ब्रास वाळूसाठ्याच्या लिलावाला भेट दिली असता, या ठिकाणी उत्पन्न बंद होते. मात्र, पावती पुस्तकाची पडताळणी केली असता वाहतुकीसाठी लागणारा पास हा बनावट असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे वाहतुकीसाठी तयार करण्यात आलेली पावती हुबेहुब खऱ्या पावतीसारखी आहे. महाराष्ट्र शासन महसूल वनविभाग जिल्हाधिकारी कार्यालय, गौण खनिज वाहतूक परवाना असे पावतीवर लिहिलेले आहे. पावतीवर एका बाजूला भारताची राजमुद्रा छापण्यात आली आहे. एका बाजूला कोड छापण्यात आला आहे. ही पावती प्रशासनाची अधिकृत पावती आहे. पावतीवर अपर जिल्हाधिकारी अहमदनगरच्या नावाने ठळक शिक्का देखील मारण्यात आला आहे. 

बनावट पद्धतीने तयार करण्यात आलेली पावती देखील खऱ्या पावतीसारखी दिसते. प्रशासनाच्या अधिकृत पावतीवर अपर जिल्हाधिकारी नावाने शिक्का मारण्यात आला आहे. बनावट पावतीवर अप्पर जिल्हाधिकारी अहमदनगर नावाने शिक्का मारण्यात आला आहे. या बनावट पावतीवर मारण्यात आलेल्या शिक्क्यात राजमुद्रा अस्पष्ट दिसते. त्याचबरोबर अप्पर जिल्हाधिकारी हे नाव देखील अस्पष्टपणे छापण्यात आले आहे. 

या बनावट पावत्या अपर जिल्हाधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्या आहे. पावत्या छापणाऱ्या संबंधितांवर अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणात कोपरगाव तहसील प्रशासन गौण खनिज विभागातील काही अधिकारी संबंधिताला पाठीशी घालत आहेत, अशी चर्चा आहे. 

प्रशासनाने गंभीर दखल घेतली 
वाळूवाहतुकीच्या बनावट पावत्या तयार करणाऱ्यांवर कोपरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या पोलिसांकडून चाैकशी सुरू अाहे. पोलिस चौकशीत जे होईल, त्यानूसार पुढची कारवाई करण्यात येईल.झालेला प्रकार हा गंभीर आहे. त्याची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे.
- भानुदासपालवे, अपर जिल्हाधिकारी. 

गौण खनिज विभागाचा सहभाग? 
वाळूवाहतुकीसाठी बनावट पास तयार केल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी अपर जिल्हाधिकारी भानुदास पालवे यांच्या आदेशानंतर धारणगावचे तलाठी सुनील साबणे यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला असला तरी बनावटगिरीत गौण खनिज विभागातील अन्य काहींचा सहभाग असल्याची चर्चा आहे. पोलिस या विभागाचीही चौकशी करण्याची शक्यता आहे. 
बातम्या आणखी आहेत...