आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस निरीक्षक ढेकणेंना नोटीस

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - आदेशानुसार चौकशी करून अहवाल सादर न केल्याने तोफखाना पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक ढेकणे यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर. एस. आडकिने यांनी मंगळवारी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली. 26 जुलैपर्यंत म्हणणे सादर करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले आहेत.

खुनाच्या गुन्ह्यातील तत्कालीन संशयित आरोपी दीपक नामदेव सावंत अटकेत असताना पोलिसांनी त्याची राखाडी रंगाची स्कार्पिओ याच गुन्ह्यात जप्त केली. मात्र, दोषारोपपत्रात पांढर्‍या रंगाची स्कार्पिओ जप्त करण्यात आल्याचे दाखवण्यात आले. नोव्हेंबर 2011 मध्ये ताब्यात घेतलेले वाहन दोषारोपपत्रात न आल्याने पोलिसांनी या वाहनाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा संशय सावंत याना आला. त्यानुसार सावंत याने अँड. प्रसन्ना जोशी यांच्यामार्फत पोलिसांविरुद्ध न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केली. उपअधीक्षक श्याम घुगे, पोलिस कर्मचारी युसूफ लालमोहन शेख, प्रसाद मारुती भिंगारदिवे, हेमंत जबाजी खंडागळे, जोसेफ विलास साळवे यांच्याविरुद्ध ही फिर्याद आहे. या फिर्यादीवर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आडकिने यांच्यासमोर सुनावणी झाली. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम 202 नुसार संबंधितांची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने पोलिस निरीक्षक ढेकणे यांना दिले.

आदेश होऊन साडेतीन महिने उलटले तरीही ढेकणे यांनी पोलिस असलेल्या आरोपींची चौकशी केली नसल्याची तक्रार अँड. जोशी यांनी न्यायालयाकडे केली. यावर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आडकिने यांनी निरीक्षक ढेकणे यांना कारणे दाखवा नोटीस देऊन 26 जुलैपर्यंत म्हणणे मांडण्याचा आदेश दिला.