Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | credit society gold on rent issue

पतसंस्थांनी सोने तारण कर्जवाटप थांबवले

उमेश मोरगावकर | Update - Oct 21, 2011, 09:17 AM IST

बँकिंग व्यवस्थापन प्रणालीचा आत्मा समजल्या जाणाऱया ‘सीडी रेशी’चे प्रमाण आदर्श ठेवण्यासाठी शहरातील विविध बँका व पतसंस्थांनी सोने तारण कर्ज सुविधा बंद केली आहे. त्यामुळे शेतकऱयांची कुचंबणा होत आहे.

  • credit society gold on rent issue

    पाथर्डी - बँकिंग व्यवस्थापन प्रणालीचा आत्मा समजल्या जाणाऱया ‘सीडी रेशी’चे प्रमाण आदर्श ठेवण्यासाठी शहरातील विविध बँका व पतसंस्थांनी सोने तारण कर्ज सुविधा बंद केली आहे. त्यामुळे शेतकऱयांची कुचंबणा होत आहे.
    कपाशीची लागवड करण्यासाठी अनेक शेतकऱयांनी काळ्या बाजारातून वाढीव दराने बियाणे व खते घेण्याकरिता आपल्याकडील सोने बँका व पतसंस्थांमध्ये गहाण ठेवून कर्ज काढले. शहरातील प्रत्येक बँक व पतसंस्थेमध्ये सोने तारण कर्जासाठी रांगा लागल्या होत्या. एकूण ठेवींच्या तुलनेत किती कर्जवाटप करायचे याचे निकष पाळणे बँका, पतसंस्थांवर बंधनकारक असते. ते धुडकावल्यास सहकार खात्याच्या कारवाईला सामोरे जावे लागत असल्याने शहरातील सर्वच बँका व संस्थांनी आपला सीडी रेशो (पतठेवप्रमाणे) आदर्श राखण्यासाठी सोने तारण कर्जसुविधा बंद केली आहे. त्यामुळे कर्ज घेण्याची निकड असणाऱयांना सोनाराकडे जाऊन सोने मोडण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.
    जिल्हा बँक व अर्बन बँकेत ही सुविधा चालू असली, तरी जिल्हा बँक ठरावीक प्रमाणात कर्ज वाटून सुविधा बंद करते, तर अर्बन बँकेमध्ये दोन-दिवस प्रतीक्षा करावी लागते. सहकार खात्याचे निर्बंध नसलेल्या काही बँकांनी वाढत्या सोने तारण कर्जाच्या मागणीचा फायदा उठवत अवाच्या सवा दराने व्याज आकारणी करीत ही सेवा पुरवली. मात्र, सीडी रेशोचे प्रमाण राखण्यासाठी आता त्यांनीही सोने तारण कर्जवाटप बंद केले आहे.
    बँका व पतसंस्थांचे लेखापरीक्षण करताना आदर्श सीडी रेशोला 40 गुण दिले जातात. हा रेशो न पाळल्यास कारवाईची भीती असल्याने पैसा उपलब्ध असूनही कोणतीही बँक, पतसंस्था ती जोखीम घेत नाही. यात सर्वाधिक अडचण ऊसतोड मजुरांची झाली आहे. चार महिने ऊसतोडीसाठी जाताना हे मजूर आपल्याकडील सोने बँकांमध्ये गहाण ठेवतात. सध्या ही सुविधा उपलब्ध नसल्याने सोने कोठे ठेवायचे असा प्रश्न त्यांना पडला आहे.

Trending