आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पतसंस्था लुटीचा कॅशिअरचाच बनाव, बारा लाखांची रोकड जप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - श्रीगोंदे तालुक्यातील ढवळगाव येथील राजमाता जिजाऊ पतसंस्थेतील १२ लाख १२ हजार ९९० रुपयांची चोरी बेलवंडी पोलिसांनी दोन दिवसांतच उघडकीस आणली. पतसंस्थेचा कॅशिअर भानुदास शिंदे (३०, पानोली, ता. श्रीगोंदे) हाच या गुन्ह्यातील मास्टरमाइंड होता, हे तपासात समोर आले. पतसंस्थेतून त्यानेच रोकड गायब केली होती. चोरलेली सर्व रक्कम त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक डाॅ. सौरभ त्रिपाठी यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी अतिरिक्त अधीक्षक पंकज देशमुख हेही उपस्थित होते.

राजमाता जिजाऊ महिला पतसंस्थेच्या कॅशिअरच्या तोंडावर गुंगीचे औषध मारून चोरांनी दिवसाढवळ्या १२ लाख १२ हजार ९९० रुपयांची रोकड मोबाइल लांबवल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली होती. पोलिस अधीक्षक डॉ. त्रिपाठी, अतिरिक्त अधीक्षक देशमुख, कर्जतचे पोलिस उपअधीक्षक विजय लगारे यांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सुरु झाला. बेलवंडीचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन वांगडे तपास पथकातील हेड कॉन्स्टेबल बबन कोळेबर, बबन साळवे, कैलास देशमुख, आबासाहेब झावरे यांनी दोनच दिवसांत या गुन्ह्याची उकल केली.

कॅशिअर शिंदे शुक्रवारी दुपारी पतसंस्थेत एकटाच असताना चोरट्यांनी त्याच्या तोंडावर गुंगीचा स्प्रे मारला. तो बेशुद्ध झाल्यानंतर चाेरट्यांनी पतसंस्थेतील रोकड घेऊन पोबारा केला. या प्रकाराची माहिती समजल्यानंतर वांगडे त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. शिंदे याच्याकडे केलेल्या चौकशीत काही विसंगती आढळून आली. तथापि, पतसंस्थेचे व्यवस्थापक जाधव यांच्या फिर्यादीवरुन गुन्ह्याची नोंद करण्यात आली. विसंगत घटनाक्रम लक्षात घेता पोलिसांनी शिंदे याची कसून चौकशी केली. त्यांनी अखेर आपणच हा गुन्हा केल्याची कबुली दिली.

पोलिसांनी हिसका दाखवताच त्याने मित्राच्या घरी नेऊन ठेवलेली १२ लाख १२ हजार ९९० रुपयांची रोकड मोबाइल फोन पोलिसांच्या हवाली केला. या गुन्ह्याच्या तपासात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांचीही मदत झाली. शिंदेला पोलिसांनी अटक केली आहे. त्याने यापूर्वीही पतसंस्थेत काही संशयास्पद व्यवहार केलेे आहेत. ते मिटवण्यासाठीच त्याने ही रोकड चोरीला गेल्याचा बनाव रचला असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. तरीही गुन्ह्याचे नेमके कारण काय, याचा बेलवंडी पोलिस कसून शोध घेत आहेत.
जिजाऊ पतसंस्थेतून चोरीस गेलेली संपूर्ण रोकड पोलिसांनी दोन दिवसांतच हस्तगत केली. मुद्देमालासह पोलिस अधिकारी. छाया : सािजद शेख
सखोल चौकशी होणार
स्वत:काम करत असलेल्या पतसंस्थेत कॅशिअर शिंदे याने चोरीचा बनाव का रचला, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, शिंदे याने एवढी मोठी रोकड कशासाठी चाेरण्याचा प्रयत्न केला, त्याने ज्या मित्राच्या घरात ही रोकड ठेवली होती, त्याचा या गुन्ह्यात काही सहभाग आहे का, यादृष्टीने बेलवंडी पोलिस तपास करत आहेत. शिंदे याचे पतसंस्थेतील कामकाज यापूर्वीही वादग्रस्त असल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे पोलिस गुन्ह्याशी संबंधित सर्वांची सखोल चौकशीही करणार आहेत. शिंदेवर यापूर्वी कारवाई का झाली नाही, हाही प्रश्न उपस्थित होत आहे.
निष्काळजीपणा नको
बहुतांश पतसंस्थांच्या ग्रामीण भागातील कार्यालयात सुरक्षेची कोणतीच खबरदारी घेतली जात नाही. मोठमोठ्या रकमांचे व्यवहार होत असूनही साधा सुरक्षारक्षकही नेमण्याची तसदी घेतली जात नाही. सहकार संस्थांनी किमान रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करायला हवी. संस्थांमध्ये पैसे गुंतवणाऱ्या जनतेच्या रकमेची सुरक्षितता खरेतर पदाधिकाऱ्यांची जबाबदारी आहे, पण ते सर्रास हलगर्जीपणा करतात अन् चोरट्यांना आयते निमंत्रण मिळते. किमान सुरक्षारकक्षक सीसीटीव्ही बसवले, तरी असे प्रकार टाळता येऊ शकतात. डॉ. सौरभ त्रिपाठी, पोलिस अधीक्षक.
बातम्या आणखी आहेत...