आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बास्केट बॉलच्या मैदानावर क्रिकेट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - नगरच्या क्रीडा संकुलातील कबड्डी, खो-खो, बास्केट बॉल व व्हॉलिबॉलच्या मैदानांवर चक्क क्रिकेटचे डाव रंगले आहेत. लॉन टेनिसच्या मैदानाची, तसेच बॅडमिंटन कोर्टाची देखभाल खेळाडू स्वत:च करतात. या सर्व कारणांमुळे क्रीडा संकुलाच्या उद्दिष्टांनाच हरताळ फासला जात आहे.
नगरचे क्रीडा संकुल निर्मितीपासून कायमच विविध वादाच्या भोवर्‍यात सापडले आहे. त्यामुळे नगरच्या क्रीडा क्षेत्राचे मोठे नुकसान होत आहे. खेळांना त्याचा काही उपयोग होत नसेल, तर कोट्यवधींचा खर्च करून हे संकुल कशासाठी बांधले, असा खेळाडूंचा सवाल आहे. या संकुलात सध्या फक्त बॅडमिंटन व क्रिकेट असे दोनच खेळ खेळले जातात. त्यातही क्रिकेट खेळणार्‍यांना ही मैदाने कमी पडत असल्याने कबड्डी, खो - खो च्या मैदानावरही क्रिकेटचा डाव रंगलेला असतो. व्हॉलिबॉलच्या मैदानावरील जाळी चक्क गुंडाळून तेथेही मुले क्रिकेट खेळताना दिसतात. या मैदानांवर संबंधित खेळ होण्यासाठी सुविधा नाहीत, यामुळे या मैदानाचा उपयोग क्रिकेटसाठी होत आहे.

वृक्षलागवडीकडे दुर्लक्ष : हे संकुल उभारताना अडथळा येणारी व अडथळा न येणारीही मोठी झाडे तोडण्यात आली. नगर शहरात उद्यानांची वानवा असताना पालिकेचे अख्खे महात्मा गांधी उद्यान नष्ट करण्यात आले. हिरव्या उद्यानाच्या जागेवर सिमेंटचे जंगल उभे राहिले. क्रीडा संकुल उभारल्यानंतर मोकळ्या जागेत किंवा मैदानांभोवती वृक्षलागवड करणे आवश्यक होते. मात्र, तसे न झाल्याने आज येथे ओसाडपणा जाणवतो. दुपारच्या वेळी खेळाडूंना बसण्यासाठीही सावली नसल्याने ते हैराण झाले आहेत. मुख्य मैदानांभोवती दाट व सदाहरित झाडे लावावीत, अशी खेळाडूंची मागणी आहे.
खेळाडूंना मूलभूत सुविधा द्याव्यात - जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय या क्रीडा संकुलाचे मालक असल्याप्रमाणे फक्त खेळाडू्ंकडून भाडे वसूल करते. परंतु कुठल्याही सुविधा उपलब्ध करून देत नाही, अशी खेळाडूंची तक्रार आहे. चांगल्या स्वच्छतागृहांची सुविधा आणि स्वच्छ व थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांनी आदेश द्यावेत, अशी मागणी खेळाडूंनी ‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधीकडे केली.